दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या उन्हाळी सुट्या असल्याने अनेक लहान मुले आपल्या आजी-आजोबा, मामा, मावशी, काका किंवा नातेवाईकांकडे गेली आहेत. अशाच प्रकारे नाशिक शहरातील एक चिमुरडा तालुक्यातील मोहाडी येथे आपल्या नातेवाईकांकडे आला. अंगणात खेळता खेळता तो अचानक विहिरीत पडला. आणि त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशांत अजय गोवर्धने (वय ४.५ वर्षे, रा. मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) असे मृत मुलाचे नाव आहे. दिशांत हा आपल्या वडिलांसह मोहाडी येथील नातेवाईकांकडे आला होता. सायंकाळच्या सुमारास तो अंगणात खेळत होता. मात्र, खेळता खेळता तो परिसरात असलेल्या सार्वजनिक विहिरीजवळ केला. आणि अचानकपणे तो या विहीरीत पडला. त्यावेळी तेथे कुणीही नसल्याने त्याला काहीच मदत मिळाली नाही अखेर दिशांतचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरी दिशांत दिसत नसल्याने त्याच्या वडिलांसह नातेवाईकांनी शोधाशोध केली. अखेर विहीरीजवळ दिशांतचे बूट दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत उतरून दिशांतचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गोवर्धेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिशांत हा अतिशय चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. अतिशय हसता खेळता दिशांत आता नाहीसा झाल्याने परिसरात खुपच हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik Child Drown in Well Death