नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे शहरातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि माजी नगरसेविका इंदुमती नागरे यांचे पुत्र विक्रम नागरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत घोटी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
घोटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध शिंदे (रा. भरवीर खुर्द, ता. इगतपुरी) या युवकाने राहत्या घरी आत्महत्या केली. एका प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. मृत अनिरुद्धच्या पत्नी वैशालीने घोटी पोलिसांकडे तक्रार दिली की, मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांनी अनिरुद्ध यास खंडणीच्या एका खोट्या गुन्ह्यात अडकवले. तसेच हे दोघे जण वारंवार त्याला त्रास देत होते. या जाचाला कंटाळूनच अनिरुद्धने आपले जीवन संपवले. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी घोटी पोलिस स्टेशनच्या आवारात आंदोलन केले. त्याची दखल घेत अखेर शहाणे आणि नागरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता नाशिक ग्रामीण पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.
वैशाली यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अनिरुद्ध हा सातपूर औद्योगिक वसाहतीतील एक कंपनीत कामाला होता. तो सातपूर येथे राहत होता. मात्र, विक्रम नागरे यांनी सातपूर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अनिरुद्धवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्ररकरणी अनिरुद्ध तुरुंगात होता. आता तो जामीनावर सुटला होता. याप्रकरणात शहाणे आणि नागरे यांनी फसवले. मला खुप त्रास होत आहे त्यामुळे मी जीवन संपवत असल्याचे अनिरुद्धने फोनवरुन सांगितले. तसेच, अनिरुद्धने लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार शहाणे आणि नागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik BJP Leaders Mukesh Shahane Vikram Nagre FIR Booked
Crime Abetment of Suicide