इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्हिजन नाशिक
नाशिक आणि शिर्डी विमानतळाचे भवितव्य
मित्रांनो, मागील आठवड्यात एक महत्वपूर्ण बातमी आली कि, शिर्डी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ ची परवानगी मिळाली असून गेल्या दोन महिन्यात शिर्डीला समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत ट्रेन नंतर मिळालेली ही तिसरी भेट आहे. ‘नाईट लँडिंग’ ची सोय झाल्याने साईभक्तांना शिर्डीला विमानाने रात्रीही पोहोचता येणार असून सकाळच्या काकड आरतीला देखील हजेरी लावता येईल. ह्यामुळे भाविकांच्या संख्येत वाढ होऊन परिसराच्या विकासाला गती प्राप्त होणार असून पर्यायाने स्थानिक अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे. शिर्डी करीता ही नक्कीच सुखद बातमी आहे. परंतु नाशिककर ह्या बातमीकडे कसे बघतात? ह्या बाबतीत समाज माध्यमांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्हीही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्यात. काहींचे म्हणणे होते कि नाशिक करिता हि चांगली बातमी आहे तर दुसरा मतप्रवाह असा होता कि नाशिकच्या विकासाला ‘साईड ट्रॅक’ केले जात आहे.
नाशिकपासून साधारण ९० कि.मी. म्हणजेच अवघ्या दीड तासाच्या अंतरावर असलेल्या शिर्डी विमानतळाचे उदघाटन १ ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांचे हस्ते झाले तर नाशिक विमानतळाचे उदघाटन ३ मार्च २०१४ रोजी तत्कालीन अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री मा. प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते झाले होते. गेल्या नऊ वर्षांमध्ये नाशिक विमानतळाची किंवा एकंदरीत हवाईसेवेची हवी तितकी प्रगती झालेली नाही. किंबहुना अनंत अडचणींवर मात करून नाशिककर नियमित विमानसेवा सुरु राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. विमानतळाच्या इमारतीचे हस्तांतरण, नाशिक विमानतळ एअर मॅपवर येण्याचा विषय, विविध प्रकारच्या परवानग्या (क्लियरन्स), कोरोना महामारीचे संकट, ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेला मुदतवाढीचा विषय असो, वेळेवर फ्लाईट रद्द होणे किंवा गैरसोयीचे वेळापत्रक असो नाशिकची हवाई वाहतूक रडतखडत सुरु आहे.
खरंतर, नाशिकचे ओझर विमानतळ हे सर्वात सुरक्षित, सर्वात मोठा रन-वे, नाईट लँडिंग सुविधा, उत्तम हवामान आणि दृश्यमानता (व्हिजीबिलिटी) असलेले विमानतळ आहे. शिवाय नाशिककरांनी हवाई सेवेला वेळोवेळी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. वेळोवेळी विविध संघटना, उद्योजक आणि व्यक्तींनीं स्वखर्चाने नाशिकच्या विमानसेवेचे मोठमोठे होर्डिंग्स आणि दिशादर्शक बोर्ड लावून मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग केले आहेत.
नाशिक हे धार्मिक शहर असूनही औद्योगिक प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक वरचा आहे. आपल्या नाशिक मधील सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, गोंदे, इगतपुरी, विंचूर इत्यादी औद्योगिक वसाहतींमध्ये साधारण पाच हजारांहुन अधिक उद्योग यशस्वीरित्या सुरु आहेत. नाशिकमध्ये येणारा पर्यटक हा केवळ धार्मिक पर्यटनासाठी येत नाही तर कृषी पर्यटन, वाईनरी पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन (इको टुरिजम), आरोग्य किंवा वैद्यकीय पर्यटन, साहसी पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन इत्यादी विविध कारणांनी नाशिकला वर्षभर भेट देत असतो. आपले नाशिक, ‘मुंबई, पुणे आणि नाशिक’ ह्या सुवर्ण त्रिकोणामधील तिसरे आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक महत्वाचे शहर आहे. मुंबई, ठाणे, पुणे नंतर नाशिकचे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. नाशिकची इतकी सारी बलस्थाने असतांना नाशिकला हवी तशी ‘एअर कनेक्टिव्हिटी’ का शक्य होत नाही? नाशिकसारख्या वैशिष्ठय पूर्ण शहरापेक्षा तुलनेने छोट्या शहरांमधील हवाई वाहतूक सेवा अधिक चांगल्या प्रकारे आणि नियमित सुरु आहेत. काय कारण असेल?
नाशिकहून दररोज हजारो प्रवासी मुंबई, पुणे किंवा शिर्डी विमानतळावरून पुढील प्रवास करतात. नाशिक जिल्हा कृषिप्रधान असून येथे ‘एयर कार्गो’ सेवेसाठी देखील खूप चांगल्या संधी आहेत. नाशिकची द्राक्षे, कांदे, विविध प्रकारचा भाजीपाला, हंगामी फळे, नाशिकची प्रसिद्ध वाईन यांना संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात चांगली मागणी आहे. नाशवंत कृषी उत्पादनांच्या मालवाहतुकीसाठी ‘एयर कार्गो’ सेवा हा चांगला पर्याय आहे. आपल्या नाशिक विमानतळावरून हजारो शेळ्या आणि मेंढ्यांची सुद्धा यशस्वी निर्यात झालेली आहे. नाशिक विमानतळाचा लाभ केवळ नाशिकसाठीच नव्हे तर जिल्ह्यातील हातमागासाठी प्रसिद्ध असलेले मालेगांव, पिंपळगाव, निफाड, दिंडोरी, सटाणा, कळवण, तसेच शेजारील धुळे, नंदुरबार, आणि जळगाव जिल्हावासियांसाठी देखील तितकाच महत्वपूर्ण आहे. त्याशिवाय नाशिक हा शक्ती, मुक्ती आणि भक्ती कॉरिडॉरने जोडलेला आहे. त्यामुळे भाविक, पर्यटक आणि तीर्थकरुंची मोठी मांदियाळी नाशकात येत असते.
नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो मुस्लिम भाविक पवित्र हज यात्रेसाठी मुंबई विमानतळावरून पुढील प्रवास करतात, त्यांच्यासाठी सुद्धा नाशिक विमानतळ अत्यंत जवळ आणि सोयीचे आहे. नाशिक विमानतळावर असलेल्या नाईट लँडिंग, एअर ट्रॅफिक कंट्रोल, इंधन भरण्याची आणि पार्किंगची सुविधा असल्यामुळे देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुद्धा शक्य होणार आहे. देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळाच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या मुंबई विमानतळावरचा हवाई वाहतुकीचा भार लक्षात घेता, नाशिक विमानतळ व्यवहार्य व सक्षम पर्याय ठरेल आणि हवाई वाहतूक कोंडीचा प्रश्नही निकाली निघेल यात शंका नाही.
नाशिक विमानसेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (HAL) संस्थेने हवाई वाहतुकीसाठी आपल्या सेवा २४ तास उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एच.ए.एल. तर्फे संरक्षण विभागाच्या विमानांचे ‘मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉलिंग’ (MRO) करण्याची सोय उपलब्ध आहे. आता तर व्यावसायिकदृष्ट्या खासगी हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांचे एम.आर.ओ. चे काम सुरु झाल्याने प्रवासी वाहतुकीची विमाने एम.आर.ओ. साठी ओझर मधील एच.ए.एल. मध्ये पाठवण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे. ह्यामुळे नाशिकची विमानसेवा खऱ्या अर्थाने नियमितपणे सुरु राहण्यास मदतच होणार आहे.
नाशिक एक विकसित असे धार्मिक, ऐतिहासिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि देशाची महत्वपूर्ण कृषी बाजारपेठ असलेले शहर आहे. सध्या ‘उडान’ योजनेखाली सुरु असलेली विमानसेवा नाशिकला छोट्या विमानाने इतर शहरांशी जोडणारी असली तरी नाशिकच्या शाश्वत आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने मोठ्या आसन क्षमतेची विमानसेवा असणे ह्याबाबीस कुठलाही पर्याय होऊ शकत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने इतर शहरांमधून नाशिक करिता ‘हॉपिंग फ्लाईट्स’ चे नियोजन होणे आवश्यक आहे.
सध्या नाशिकहून बाहेर प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातूनच विमानसेवेचा विचार केला जात आहे, त्यासोबतच इतर शहरांमधून सुद्धा नाशिक मध्ये प्रवासी, पर्यटक विमानाने कसे येतील ह्याचे नियोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ नाशिक – तिरुपती, नाशिक – वाराणसी, नाशिक-जम्मू (वैष्णोदेवी), नाशिक-अमृतसर, नाशिक-नांदेड, नाशिक-अजमेर इत्यादी धार्मिक तसेच आय.टी. आणि बिझनेस सर्किटस साठी आवश्यक असलेल्या शहरांना जोडणे गरजेचे आहे.
सध्यस्थितीत नाशिकहून फक्त नवी दिल्ली आणि हैद्राबाद ह्या रूट्स वर ‘स्पाइसजेट’ ची विमानसेवा सुरु असून लवकरच म्हणजे येत्या १५ मार्चपासून ‘इंडिगो’ ची नागपूर, गोवा, आणि अहमदाबाद इ. शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. ‘स्पाइसजेट’ आणि ‘इंडिगो’ कडून चेन्नई, बेंगळुरू, बेळगांव, जयपूर, इंदोर, मुंबई, पुणे आणि अजुन काही महत्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरु होण्याची अपेक्षा आहे. येत्या काळात नाशिकची विमानसेवा अधिक गतिमान होईल अशी आशा आहे. नाशिकहून विमानसेवा नियमित सुरु असावी ह्याकरिता प्रामुख्याने ‘आयमा’, ‘तान’, ‘मी नाशिककर’ इत्यादी विविध संघटना सतत कार्यरत आहेत.
आम्हाला असे वाटते कि, शिर्डी विमानतळाकडे स्पर्धक म्हणून न पाहता “नाशिकच्या विकासासाठी पूरक असलेले एक सहकारी विमानतळ” म्हणून नियोजन केल्यास दोन्ही शहरांसोबत संपूर्ण परिसराचा विकास निश्चित होणार. नाशिक आणि शिर्डी विमानतळा दरम्यान वाहतुकीसाठी एक्सप्रेस कॉरिडॉर केल्यास आणि परिसरातील सर्व महत्वाच्या धार्मिक स्थळांना (पवित्र रामकुंड, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंग गड) पर्यटन सर्किट द्वारे जोडल्यास संपूर्ण परिसरातील उद्योग, व्यवसाय, रोजगार आणि एकूण अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. २०१७ साली, म्हणजेच अजून चार वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे.
२०१४ मध्ये असलेल्या केवळ ७४ विमानतळांची संख्या आतापर्यंत १४७ ने वाढून, भारत जगातील तिस-या क्रमांकाची विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे आणि वेगाने वाढतच आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून येणाऱ्या काळात भारताचे आगामी विकासाचे उड्डाण ‘टियर-२’ आणि ‘टियर-३’ शहरांमुळे असणार आहे. महाराष्ट्रामध्ये ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची प्रचंड क्षमता आहे. कित्येक देशांची अर्थव्यवस्था हि केवळ तेथील पर्यटन स्थळांच्या नियोजनबद्ध रित्या केलेल्या विकासामुळे आणि जागतिक पर्यटकांना आकर्षित केल्यामुळे वाढलेली आहे.
आपल्याकडे असलेली विमानसेवा टिकवून अजून कशी वाढवता येईल? पर्यटन विकास, उद्योग-व्यवसाय, स्थानिक रोजगार वाढीसाठी सर्व मा. लोकप्रतिनिधी, महापालिका, प्रशासन, उद्योजक, व्यावसायीक आणि संघटनांनी पुढील २५-३० वर्षांचे शाश्वत नियोजन आणि नाशिकचे ब्रॅंडिंग करण्यासाठी एकत्र येणे फार गरजेचे आहे. देशी-परदेशी प्रवासी नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना गरजेच्या असलेल्या सुविधा, विश्रामगृह, फूड-कोर्ट, माहिती केंद्र, प्रशिक्षित गाईड, लोकल ट्रान्सपोर्ट, सिटी बस, विमानतळावर येण्या-जाण्यासाठी उच्च दर्जाचा समर्पित रस्ता, दिशादर्शक बोर्ड, इत्यादी मूलभूत कामांकडे लक्ष देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. नाशिककरांनो आपणास काय वाटते?
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियुष सोमाणी (सहलेखक – विशाल जोशी)
श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Nashik and Shirdi International Airport Future by Piyush Somani