नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने कोळपेवाडी ता.कोपरगाव येथील २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील शुभेच्छा लॉन्स भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदिप शेषराव मुळेकर (रा.कोळपेवाडी जि. अहिल्यानगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. कोळपेवाडी येथील मुळेकर हा पंचवटीतील फुलेनगर भागात आपल्या सासरवाडी येथे आला होता. मंगळवारी (दि.११) सायकाळी तो आपल्या मावशीस भेटण्यासाठी दिंडोरी येथे गेला असता हा अपघात झाला.
मावशीला भेटून दुचाकीवर परतत असतांना शुभेच्छा लान्स परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर भरधाव दुचाकी आदळली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. मित्र विकास वानखेडे याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राजेश जगताप करीत आहेत.