नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव खासगी प्रवासी बसने दिलेल्या धडकेत २८ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात चेहडी शिव भागातील सर्व्हीस रोडवर झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पसार झालेल्या बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्की भिमराव वाकळे (रा.शिंपी समाज मंगल कार्यालयाजवळ,दत्तचौक सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. वाकळे गेल्या गुरूवारी (दि.१०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिंदेगावाकडून नाशिकरोडच्या दिशेने आपल्या एमएच १५ जेजी ६१३५ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. लाला का ढाबा या हॉटेलसमोर दोन महिला व एक मुलगी रस्ता ओलांडत असल्याने वाकळे याने आपल्या ताब्यातील दुचाकीचा वेग कमी केला असता पाठीमागून भरधाव येणा-या जीजे १४ व्ही ५५८८ या ट्रव्हल्सच्या खासगी प्रवासी वाहतूक करणा-या बसने दुचाकीस धडक दिली.
हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीवर प्रवास करणारा वाकळे रस्त्यावर फेकला गेला तर दुचाकी रस्ता ओलांडणा-या संस्कृती पांडे या मुलीच्या पायावर जावून आदळली. या घटनेत बसचे चाक अंगावरून गेल्याने वाकळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत भाऊ अक्षय वाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पसार झालेल्या बसचालकाविरोधात पोलीस दप्तरी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.