नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक शहर परिसरातील वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू झाला. त्यात २८ वर्षीय तरूणासह ५४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
सिडकोतील विक्की भिमराव वाकळे (२८ रा.साई समर्थ अपा.मार्गशिष सेक्टर) हा युवक गुरूवारी (दि. १०) रात्री नाशिक पुणे मार्गावरून दुचाकीवर प्रवास करीत होता. नाशिकरोडच्या दिशेने तो जात असतांना टोलनाक्याजवळील हॉटेल बासूरी समोर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखणी झाल्याने त्यास अॅम्ब्युलन्स चालक संतोष झाडे यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
दुसरा अपघात आयनॉक्स सिग्नल भागात झाला. धर्मेद्र सुकाळी चौधरी (५८ रा.पंचशिलनगर,शिवाजीनगर) हे शुक्रवारी (दि.११) सकाळी मोटारसायकलवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला पंचशिलनगर येथून मुंबईनाक्याच्या दिशेने ते प्रवास करीत असतांना ऑयनॉक्स सिग्नल भागात पाठीमागून भरधाव आलेल्या मालट्रकने दुचाकीस कट मारला. या अपघातात चौधरी दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. मित्र निखीलसिंग याने त्यांना तातडीने नजीकच्या सुविचार हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.निखील बोरा यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.