नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सी जवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार झाल्याची घटना घडली. शुभम विजय वासुळकर (रा.सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या तरूण कामगाराचे नाव आहे. वासुळकर औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यातील कामगार असून तो रविवारी रात्री आपल्या दुचाकीवर कामावरून घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सी जवळ वासुळकर रस्ता ओलांडत असतांना नाशिककडून त्र्यंबकच्या दिशेने भरधाव जाणा-या कारने त्यास धडक दिली. या अपघातात कारने दुचाकीसह फरफटत नेल्याने शुभमचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.