नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. एसीबीच्या पथकाच्या गळाला भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकासह कनिष्ठ लिपीक लाच घेताना सापडला आहे. तब्बल १ लाखाची लाच मागणाऱ्या आणि प्रत्यक्षात ५० हजार रुपये स्वीकारताना थेट क्लास वन अधिकाऱ्यासह लिपीक सापडला आहे. या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, महेश कुमार महादेव शिंदे (वय ५० वर्ष, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, अतिरिक्त कार्यभार उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक) आणि अमोल भीमराव महाजन (वय ४४ वर्ष, कनिष्ठ लिपिक, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नाशिक) अशी लाच घेतलेल्यांची नावे आहेत.
वडिलांचे नावे असलेल्या शेतजमिनीचा भूमी अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना १२ मध्ये लिखाण प्रमादाची चूक झाली होती. सदरची चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी शिंदे याने तब्बल १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी ५० हजार रुपये त्याने स्वीकारले. तसेच लिपीक महाजन याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे शिंदे आणि महाजन यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
एसीबीच्यावतीने पोलिस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस नाईक प्रकाश महाजन, चालक प्रणय इंगळे, शिपाई परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक नारायण न्याहाळदे आणि पोलिस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ 1064 क्रमांक वर संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक .*तिबेटीयन मार्केट, नाशिक किंवा टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nashik ACB Raid Corruption Bribe Trap Crime