नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचखोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणात एकापाठोपाठ पकडलेल्या लाचखोरांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. उपनिबंधक सतीश खरे,जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील आणि दोन आरोग्य सेवकांना कोर्टाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चौघांची रवानगी करण्यात आली. तत्पूर्वी खरे आणि पाटील यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी झाला. लाचखोरीच्या तपासात खरे यांच्या पाठोपाठ हिवताप अधिकारी पाटील यांचे सोन्याचे घबाडही एसीबीच्या हाती लागले असून बँक लॉकरमध्ये ७१ तर घरझडतीत १० तोळे सोने मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रंगला ड्रामा
खरेच्या पाच दिवसांच्या तर, पाटीलांच्या दोन दिवसीय तपासाअंती त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने दोघांनीही छातीत कळ आल्याचा बहाणा केला. वैद्यकीय तपासणीसाठी पाच वाजेच्या सुमारास दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एसीबी पथकाने आणले. तिथे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना उपचारार्थ दाखल करुन घेण्याचा डाव यशस्वी होण्याच्या मार्गावर होता. अवघी आरोग्यसह सहकारची यंत्रणा कामाला लागली परंतु, रूग्णालय प्रशासनाच्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची हिंमत न झाल्याने त्यांनी नकार दिला. हा खेळ तब्बल चार तास चालला. अखेरीस दोघेही रागात मान खाली घालून साडेसहा वाजता पोलिसांच्या वाहनात येऊन बसले. त्यानंतर दोघांसह राव व शिंदेना कारागृहात नेण्यात आले.
तीस लाख रुपये घेताना अटक
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांविरोधात सहकार विभागात दाखल दाव्याचा
निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याच्या मोबदल्यात लाच स्विकारतांना खरे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तीस लाख रुपये घेताना अटक झालेला उपनिबंधक सतीश खरे अनुक्रमे चार व एक असे पाच दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. शनिवारी (दि.२०) त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. खरे याच्या घरझडतीत १६ लाखांच्या रोकडसह ५४ तोळे सोने एसीबीच्या हाती लागले आहे.
वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात लाच
तर सहका-याच्या वैद्यकीय रजेच्या मंजूरीसह वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केलेल्या वैशाली दगडू पाटील (रा. स्टेटस रेसिडेन्सी, गंगापूर), संजय रामू राव (४६, पाथर्डी फाटा) व कैलास गंगाधर शिंदे (४७, पांडव नगरी) यांच्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तीघांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन दिवसांच्या चौकशीत खरे यांच्या पाठोपाठ पाटील यांचे सोन्याचांदीचे घबाड एसीबीच्या हाती लागले असून बँक लॉकरमध्ये ७१ तर घरझडतीत दहा तोळे वजनाचे दागदागिणे मिळून आले आहेत.
Nashik ACB Bribe DDR Khare Officer Patil Drama Civil Hospital