नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गळाला लागला आहे. तब्बल साडेतीन लाखाची लाच घेताना कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यानिमित्ताने बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून टक्केवारीही चर्चेत आली आहे.
याप्रकरणी एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर महेश पाटील हा नंदुरबारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. ५१ वर्षे वय असलेल्या पाटील हा रा. फ्लॅट २०३, अष्टविनायक टाॅवर, थत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे राहतो. नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुगीची कामे एका शासकीय ठेकेदाराने पूर्ण केली आहेत. तसेच सध्याच्या कालावधीत या ठेकेदाराच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे या कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा या कार्यालयात आले आहेत. परंतु नमूद तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश ठेकेदाराला मिळाले नाहीत.
ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामांबाबतची ३ कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपये एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व याव्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळणे आवश्यक होते. हे आदेश लाचखोर महेश पाटील कडून दिले जाणार होते. त्यामुळे ठेकेदाराने त्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. अनेक वेळा विनंती केली. परंतु लाचखोर पाटीलने बिलाची रक्कम मंजूर केली नाही. तसेच कार्यारंभ आदेश सुद्धा दिले नाहीत. पूर्ण केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वेळोवेळी १०% व तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५ ते १ टक्के अशा टक्केवारीच्या स्वरूपात एकत्रित ४३ लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली.
अखेर याप्रकरणी संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार, मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी ३ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम लाचखोर महेश पाटील याने त्याच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी स्वीकारली. त्याचवेळी त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
एसीबीच्या पथकामध्ये राकेश आ. चौधरी, पोलिस उप अधीक्षक, पो.नि. समाधान एम. वाघ, पो.नि. माधवी एस. वाघ, पोहवा/विलास पाटील, पोहवा/विजय ठाकरे, पोना/देवराम गावित, पोना/अमोल मराठे, पोना/ज्योती पाटील, पोना/मनोज अहिरे, पोना/संदीप नावाडेकर व चापोना/जितेंद्र महाले यंचा समावेश होता.
हा मोठी कारवाई शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहाळदे, अपर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान एसीबीने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, जयचंद नगर, नंदुरबार.
दुरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९
टोल फ्रि क्रं. 1064
Nandurbar ACB Raid Bribe Corruption Trap