नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील डॉक्टरवाडी शिवारात आयशर ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. ऊसतोड कामगारांना घेऊन हा ट्रक जात होता. तो पलटी झाल्यामुळे ३०हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर नांदगाव, मालेगाव आणि चाळीसगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्रीच्या सुमारास आयशर ट्रक पलटी झाल्याने अनेक कामगार जखमी झाल्याची बाब डॉक्टरवाडी परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली. तत्काळ पोलिस आणि अॅम्ब्युलन्सला फोन करण्यात आला. सर्व पथके घटनास्थळी दाखल झाली. या सर्वांना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लहान मुलांसह ३० पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. ३ ते ४ जण गंभीर जखमी आहेत तर उर्वरीत किरकोळ जखमी आहेत. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात या सर्वांवर उपचार करणे शक्य नसल्याने काहींना मालेगाव तर काहींना चाळीसागव येथे उपचारार्थ नेण्यात आले.
हे सर्व उसतोड कामगार हे चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आहेत. हे सर्वजण मराठवाड्यातील भीमाशंकर येथील कारखान्यावर ऊतसोड कामगार म्हणून काम करतात. रविवारी हे सर्व कामगार आपल्या गावाकडे जात होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. वेळीच मदत मिळाल्याने सर्वांवर उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.