नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वांना शिक्षण हे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण आहे. परंतु अद्याप आपल्या राज्यात अशी काही खेडेपाडे असे आहेत की, तेथे शाळेची इमारत नसल्याने लहान मुलांना शिक्षणासाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागतो, वास्तविक पाहता प्राथमिक शाळेची इमारत चांगली असली तर विद्यार्थी भावी पिढी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकते. मात्र अद्यापही याकडे शिक्षण विभाग आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झालेले दिसून येते. नांदेड सारख्या जिल्ह्यात या संदर्भातील वास्तव समोर आले आहे. या ठिकाणी चक्क शाळेची इमारत नसल्याने चक्क गुरांच्या गोठ्यात शाळा भरते. आणखी वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा जोरात पाऊस येतो तेव्हा पावसाळ्यात शाळा बंद ठेवावी लागते. याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही असा आरोप करीत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
२० वर्षांपासून अशी परिस्थिती
मराठवाडयातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या सीमे नजिक असलेल्या खिरूतांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे आहे. मात्र या शाळेला इमारत नाहीय. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे या गुरांच्या गोठ्यातच घ्यावे लागत आहेत. लोहा तालुक्यात असलेल्या खिरूतांडा हे ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळखले जाते, या गावातील लोकसंख्या ८०० असुन गावातील ९० टक्के नागरिक ऊसतोडीसाठी सुमारे सहा महिने बाहेर गावी जाते असतात. आपल्या मुलांना शिक्षणासाठी गावात नातेवाईकांकडे ठेवतात. मात्र या गावामध्ये कुठलीच सुविधा नाही. सन २००० मध्ये या तांड्यात जिल्हा परिषद शाळेला मंजुरी मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. मात्र शाळेसाठी इमारत नाही. इमारत अभावी शिक्षकांना चक्क दहा बाय पाच एवढ्या जागेत असलेल्या जनावरांच्या गोठ्यात शाळा भरवावी लागत आहे. विद्यार्थ्यांना या गोठ्यात बसवून शिक्षण घ्यावे लागत आहे. पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून सद्या शाळेत २२ विद्यार्थी व दोन शिक्षक आहेत. मागील अनेक वर्षापासून येथे ही विदारक परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर यापेक्षाही परिस्थिती गंभीर असते. शाळा भरविण्यासाठी दूसरी जागा नाही, त्यामुळे पाऊस पडला तेव्हा विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते. गेल्या वीस वर्षांपासून अशी परिस्थिती आहे
मूलभूत सुविधांचा अभाव
सध्या शासनाच्या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकताच नांदेडमध्ये येऊन गेले. खिरूतांडा या गावात शाळेच्या इमारतीसोबतच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न आहे. अशाप्रकारे गावात अनेक मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्या सोडविण्यासाठी प्रशासन अद्यापही खिरूतांडा या गावाच्या दारी पोहोचले नाही. दरम्यान, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु त्यांनी केवळ आश्वासने दिली. तर लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर गावात फिरकलेही नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सर्वशिक्षा अभियान, डिजीटल शाळेचा गवगवा करण्यात येतो. परंतु दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेला स्वतःची जागा आणि इमारत नसल्याने चक्क गुरांच्या गोठ्यात शाळा भरवावी लागत आहे, हे वास्तव आणि भयाण चित्र म्हणावे लागेल.