इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुस्लिमबांधवांमध्ये सर्वांत पवित्र मानला जाणारा रमजान महिना २३ मार्चपासून सुरू होणार आहे. त्या दरम्यान होणाऱ्या नमाज पठणसाठी लाउडस्पीकरचा वापर करता येणार नाही, असे सौदी अरेबियातील सरकारने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी नवीन नियम जाहीर केले आहेत.
रमजान महिन्यात हजरत मुहम्मद पैगंबर यांना त्यांच्या अखंड साधनेचे आणि खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले आणि त्यांना अल्लाहचे दर्शन झाले अशी मान्यता आहे. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण असे मानले जाते. मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान हा नववा महिना असतो. प्रत्येक घरातील लहान थोर मंडळी या महिन्यात रोजा ठेवतात.
रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत रोजे केले जातात. या काळात सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते आणि संपूर्ण दिवस सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. सूर्यास्त झाल्यावर नमाज अदा करून प्रार्थना केली जाते आणि नंतरच उपवास सोडला जातो. असा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळला जातो. या पवित्र दिवसांमधे कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन केले जाते. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने लाउडस्पीकरवरून नमाज पठण करण्यावर बंदी आणली आहे. तसेच इतर काही नियम जाहीर केले आहेत.
असे आहेत नवे नियम
– नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही.
– रमजानवेळी देणगी, वर्गणी मागण्यास मनाई.
– रमजानसाठी दावत मशिदीच्या आत नको. बाहेरच्या परिसरात दावत दिली जाऊ शकते. या दावताचे नियोजन सुपरव्हिजन इमामांच्या हातात असेल.
– रमजानच्या पूर्ण महिन्यात मशिदीत इमाम उपस्थित राहतील. अत्यावश्यक असेल तर ते सुट्टी घेऊ शकतात.
– इमाम नमाज वेळेवर संपवतील. जेणेकरून दुसऱ्यांना योग्य वेळ मिळू शकेल.
– मशिदीत लहान मुलांना नमाज पठण करण्यावर बंदी
– इतीकाफच्या महिन्यात म्हणजेच रमजानमध्ये मशिदीमध्ये जगापासून अलिप्त राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.
Namaj Masjid Loudspeaker Saudi Arabia New Rules