नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर महानगरपालिकेमार्फत महाल येथील चिटणवीसपुरा ग्रंथालयाचे नव्या थाटात लोकार्पण होत असताना, ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी याठिकाणावरुन मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
नागपूर महानगरपालिकामार्फत चिटणवीसपुरा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाची सुरुवात 1998 मध्ये तत्कालीन महापौर सुधाकर निंबाळकर यांनी केली होती. आमदार प्रवीण दटके यांनी पुढाकार घेत आता या ग्रंथालयाचे नूतनीकरण केले असून पाच मजली इमारतीत मुले व मुलींसाठी वेगवेगळया अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व आधुनिक सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज या ई-ग्रंथालयाचे लोकार्पण झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेमार्फत अद्यायवत करण्यात आलेले हे तिसरे ग्रंथालय आहे. अभ्यासासोबतच याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. महाल परिसरातील गुणवान विद्यार्थ्यांना इंटरनेटसह सर्व सुविधांचा निश्चितच लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संबोधनात नागपूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घटकाखाली एक हजार कोटी नागपूरला उपलब्ध केले आहे. केंद्र शासनासोबतच राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी नागपूर शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.
अमृत योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील गोदरेज आनंदम् जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आज पारपडला. केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने आदी यावेळी उपस्थित होते. या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणीपुरवठा प्रणालीचे उन्नतीकरण योजनेअंतर्गत हे लोकार्पण करण्यात आले. यामुळे गोदरेज आनंदम जलकुंभ कमांड ऐरिया, नवी शुक्रवारी, दसरा रोड, राहातेकर वाडी, रामाजीची वाडी, राममंदीर परिसरासह मोठ्या प्रमाणातील लोकवस्तीला याचा लाभ होणार आहे. पाणीपुरवठा उन्नत प्रणाली अंतर्गत महानगरपालिकामार्फत 32 जलकुंभ प्रस्तावित आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाचे आज केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्यासह उद्घाटन केले. pic.twitter.com/LRC59Ye6FI
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) April 1, 2023
Nagpur City Municipal Corporation E Library