मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातील १७ बँकांना गंडविणारे वाधवान बंधू सध्या तुरुंगात आहेत. मात्र, तुरुंग प्रशासनाच्या मेहेरनजरमुळे वाधवान बंधूंची ऐश सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत तळोजा कारागृहातील ७ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. वाधवान बंधूंना व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मुंबई देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपावरून डिएचएफएलचे माजी संचालक कपिल आणि धीरज वाधवान सध्या नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये बंद आहेत. देशातील १७ बँकांना चूना लावणारे वाधवान बंधू जेल प्रशासनाच्या वरदहस्तामुळे ऐशमध्ये शिक्षा भोगत आहेत. दोघेही मेडिकल चाचणीच्या नावाखाली आठवड्यातून अनेकदा जेलमधून हॉस्पिटलला जातात. ज्याठिकाणी पार्किंगमध्ये त्यांची विविध लोकांसोबत मिटिंग होते, वाधवान कुटुंबातील सदस्यही तिथे हजर असतात. इतकेच नाही तर दोघे मोबाईल- लॅपटॉपचा वापर करतात. घरातील आणलेले जेवण जेवतात असा प्रकार आता समोर आला आहे.
वाधवान बंधू मेडिकल चाचणीसाठी आठवड्यातून ३-४ वेळा जेलमधून हॉस्पिटलला जातात. मागील वेळी ७ ऑगस्टला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये कपिल वाधवानला चेकअपसाठी आणले होते. तर ९ ऑगस्टला धीरज वाधवान यांना जेजे रुग्णालयात आणले होते. याठिकाणी वाधवान बंधू उपचारांऐवजी आपापल्या कारमध्ये बसून कुटुंबातील सदस्य आणि निकटच्या लोकांना भेटत होते. कारमध्ये कौटुंबिक विषयांपासून उद्योगाशी निगडीत चर्चा केल्या जातात. अनेक तास हा प्रकार सुरू असतो. या दोन्ही भावंडांना जेव्हापासून तळोजामध्ये ठेवले आहे तेव्हापासून ही स्पेशल ट्रिटमेंट दिली जात आहे.
चौकशीनंतर कारवाई
वाधवान बंधू यांना मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणाचा तपास केला जाईल. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. वाधवान बंधूला जे कर्मचारी हॉस्पिटलला घेऊन जातात तो नवी मुंबई पोलिस खात्याचा स्टाफ आहे. प्रथमदर्शनी ते चुकीचे असल्याचे दिसते. दोषींवर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना होणार नाही यासाठी आम्ही लक्ष देऊ. ज्या गाड्या आरोपींना घेऊन जातात. त्यात जीपीएस लावले आहेत. प्रत्येक गाडीत सीसीटीव्ही कॅमेराही आहे, अशी माहिती डीसीपी संजय पाटील यांनी दिली.
दरम्यान, कारागृहातील ७ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Mumbai Taloja Jail 7 Police Officers Suspended
Bank Fraud Wadhwan Brothers Prison VVIP Treatment Sting Operation VIP