मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळेच सचिन तेंडुलकर यांच्या येथील निवासस्थानाबाहेर कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी एका जुगाराच्या जाहिरातीत काम केले आहे. या ऑनलाईन गेमची जाहिरात करण्यावर प्रहार संघटनेचे नेते आक्षेप घेतला. ही जाहिरात केल्याबद्दल सचिनने जाहीर माफी मागण्याची मागणीही केली होती. पण सचिन यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कडू यांनी या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून सचिन यांना या जाहिरातीतून माघार घेण्याची विनंती केली होती. पण राज्य सरकारनेही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कडू यांनी अखेर आंदोलन केले.
या आंदोलनात देव आमचा जुगार खेळतो, परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांनी आधी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, बच्चू कडू यांनी नकार दिल्याने अखेर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वारंवार paytm first जुगाराची जाहीरात बंद करण्याची विनंती केली. परंतु अद्याप ही जाहीरात बंद नाही झाली आहे. आमचा विरोध तेंडुलकरना नाही परंतु भारतरत्न व्यक्तीस ही बाब अशोभनीय आहे. एकतर त्यांनी जाहीरात बंद करावी नाहीतर भारतरत्न परत करावा. अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप व गणेश मंडळाजवळ तेंडुलकर भिकपेटी व तेंडुलकर सुचना पेटी लावण्यात येणार असा इशाराही प्रहार संघटनेने दिला आहे.
Mumbai Bharatratna Bacchu Kadu