मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई पोलिस दलामधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या बदलीचा राग महिला पोलिस कर्मचाऱ्यावर काढल्याचे समोर आले आहे. बदलीचा बदला घेण्यासाठी त्याने चक्क महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला अटक झाली आहे.
या प्रकरणातील आरोपी सहाय्यक पोलिस निरीक्षकाने महिला सहकाऱ्याचा पाठलाग तसेच तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर त्याने संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील मेसेजदेखील पाठवले. याप्रकरणी त्या पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने रितसर तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (एपीआय) अटक केली आहे. दीपक बाबूराव देशमुख असे आरोपी सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपी देशमुखने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी घुसून तिला मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. कुरार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने बुधवारी या कारवाईची माहिती दिली.
बदलीच्या संशयातून कृत्य
आरोपी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक देशमुखची नुकतीच पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ही बदली पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून केली असावी, असा संशय देशमुखला आला होता. याच संशयातून पीडितेला धडा शिकवण्यासाठी देशमुखने तिचा छळ सुरु केला, असे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरात घुसून केली मारहाण
पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने तिला आरोपीने घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील पोलिसाने त्याच्या बदलीचा बदला घेण्यासाठी केलेल्या या कृत्याची पोलिस दलासह सर्वत्र चर्चा होत आहे.
Mumbai Police Crime Women Police Molestation