मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कधीकधी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरते, विशेषतः पोलीस असो की, वरिष्ठ पदावरील पोलीस अधिकारी यांना नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी जागरूक राहावे लागते. त्याचा प्रत्यय आज मुंबईत आला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचे आज (शनिवार, १७ डिसेंबर) लग्न संपन्न झाले. मात्र, मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याने सुरक्षेसाठी आयुक्त फणसळकर हे कन्यादान न करता कर्तव्यावर हजर झाले. याचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
वास्तविक कोणताही सण, उत्सव किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, की राजकीय मोर्चा महाराष्ट्र पोलीस हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात. त्यातच मुंबईत आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघाला आहे. साहजिकच यासंदर्भातली कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आणि पर्यायाने खात्याचे प्रमुख म्हणून पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यावर होती.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अत्यंत महत्त्वाचे पद असलेल्या मुंबई पोलिस आयुक्तपदी बुधवारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती झाली. आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या सुमारे सात ते आठ अधिकाऱ्यांमध्ये फणसळकर यांच्या नावाला राज्य शासनाने पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे राज्य सत्तांतराच्या उंबरठ्यावर असताना एखाद्या अधिकाऱ्याच्या नावावर एकमत होणे हीच हुशार आणि मुंबईची जाण असलेल्या विवेक फणसळकर यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
मात्र, सध्याचे ढवळलेले राजकीय वातावरण पाहता मुंबईतील गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी फणसळकर यांना आपले कसब पणाला लावावे लागत आहे. त्यातच पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे एकीकडे आपले कर्तव्य निभावत असताना त्यांच्यासाठी आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्याही फार महत्त्वाचा आणि भावनिक आहे. त्यांच्या कन्येचे आज लग्न आहे. संध्याकाळी हा सोहळा पार पडणार असताना साहजिकच मोर्चाचे नियोजन आणि त्यात कन्येच्या लग्नासाठीच्या तयारीची लगबग ही दुहेरी कसरत त्यांनी गेले दोन दिवस केली.
घरामध्ये इतका मोठा क्षण साजरा होत असतानाच त्यांनी कर्तव्याला श्रेष्ठ मानत मोर्चाच्या नियोजनाला, तयारीला प्राधान्य दिलं, ज्याचं कौतुक आता सोशल मीडियावर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कामगिरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. विवेक फणसळकर हे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते.
कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात. फणसळकर यांची ३१ जुलै २०१८ रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. सध्या ते मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत.
राज्यात आज महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून महामोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या अनुषंगाने आज वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. या मोर्च्यसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही याला कारण म्हणजे पोलीस आयुक्तांनी पोलिसांना कडक बंदोबस्त्याच्या सूचना दिल्या होत्या.
Mumbai Police Commissioner on Duty Daughter Wedding
Vivek Phansalkar