मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीस खात्याविषयी फारसे चांगले बोलले जात नाही, पोलीस आरोपींचा शोध घेण्यास टाळाटाळ करतात, असेही म्हटले जाते. परंतु सर्वच पोलीस असे नसतात. काहीतरी कर्तव्यदक्ष पोलीस गुन्हेगारांचा किंवा आरोपींच्या तातडीने शोध घेतात. अगदी छोट्याशा पुराव्यावर देखील ते आरोपींना पकडतात, हे मुंबई पोलीस यांच्या कामगिरीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, मुंबईतून पळून गेलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील २६ वर्षीय आरोपीला बिहारमधील दरभंगा येथून अटक करण्यात आली आहे.
युपीआय पेमेंट
दक्षिण मुंबई भागातील एका २५ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने म्हटले होत की, सोशल मीडियाद्वारे तिला भेटलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती गर्भवती झाली. त्यामुळे त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणीवर बलात्कार करून फरार झालेल्या या तरुण आरोपीला बिहारमधल्या एका केशकर्तनालयात केलेल्या ५० रुपयांच्या यूपीआय पेमेंटद्वारे पोलिसांनी शोधून काढले.
असे शोधले
गेल्या महिन्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी मुंबईतून पळून गेला होता. पोलिसांनी त्याला बिहारमधून पकडून आणले. सध्या तो दरभंगा येथे त्याच्या बहिणीच्या घरी राहत होता. गुन्हा दाखल केल्यानंतर लगेचच पोलीसांची टीम आरोपीच्या मुंबईतल्या घरी दाखल झाली. परंतु त्याआधीच तो फरार झाला होता. त्याचा फोनही बंद होता, त्यामुळे त्यानंतर पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स मिळवले. कॉल डिटेल्सद्वारे त्याची ओळख, त्याच्या नातेवाईकांची नावं आणि त्यांचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला.
सलूनमध्ये
सदर आरोपी बिहारचा असून सध्या तो दरभंगामध्ये राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जवळच्याच एका गावात त्याची आई राहत असल्याचेही पोलिसांना समजले, दरभंगा हे ठिकाण नेपाळच्या सीमेनजिक असल्याने पोलिसांना आधी संशय होता की, तो कदाचित नेपाळला पळून गेला असेल. परंतु तो दरभंगा येथेच होता. मुंबई पोलिसांचे एक पथक सर्वप्रथम आरोपीच्या बहिणीच्या पत्त्यावर दरभंगा येथे गेले. परंतु पोलीस घराबाहेरच्या परिसरातच थांबले. पोलिसांचे पथक आरोपीच्या बहिणीच्या घराबाहेर गस्त घालत होते. त्याच वेळी मुंबईतल्या एका हवालदाराला संशयिताच्या बँक खात्यातून नुकतंच एक यूपीआय पेमेंट झाल्याची माहिती मिळाली. दरभंगा येथील एका सलूनमध्ये त्याने ५० रुपयांचं पेमेंट केले होते.
बहिणीच्या घरी छापा
सलूनचा यूपीआय आयडी मिळाल्यावर लगेच डिजीटल पेमेंट कंपनीकडून सलूनचे नाव, नंबर आणि पत्ता पोलिसांनी मिळवला. तसेच पोलिसांनी सलून चालकाशी संपर्क साधला. सलून चालकाला आरोपीचा फोटो दाखवला. आरोपीची माहिती मिळवून त्याच रात्री पोलिसांनी आरोपीच्या बहिणीच्या घरी छापा मारला असता आरोपी घरातच होता. पोलिसांनी आरोपीला तिथेच अटक करून मुंबईला आणले. त्याने पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केला असून तो आता तुरुंगाची हवा खात आहे.
Mumbai Police Arrest Rape Suspect UPI Payment