ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृष्ण जन्माष्टमीचा सण जवळ येत आहे. त्या निमित्ताने मुंबई आणि उपनगरांमध्ये दहीहंडी आयोजकांमध्ये उत्साहाचे वातारवण आहे. गोविंदा पथक जोरात तयारीला लागले आहेत. अशात आता कल्याणमध्ये दहीहंडीवरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
मुंबईत दहीहंडीचा थरार दरवर्षी रंगत असतो. वर्षभर या उत्सवाची प्रतीक्षा पाहण्यात येते. राजकीय पाठबळामुळे या हंडी केवळ स्पर्धा वा खेळापुरत्या मर्यादित राहीलेल्या नाहीत. त्यांना प्रतिष्ठा, वलय प्राप्त झाले आहे. अशात कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. दहहंडीसाठी पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिल्याने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
कल्याणमध्ये दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दहीहंडी उत्सवाला परवानगीसाठी शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाने पोलिसांकडे मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला परवानगी दिली. यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
शहरप्रमुखांद्वारे आरोप-प्रत्यारोप
शहर प्रमुख या नात्याने या उत्सवाचे परवानगी मागितली, मात्र पोलीस राजकीय दबावाला बळी पडलेत. सण उत्सवांमध्ये देखील राजकारण आणले जात आहे. राजकीय दबावापोटी शिंदे गटाला परवानगी देण्यात आली, लवकरच याबाबत पक्ष भूमिका घेईल, असे शहर प्रमुख सचिन बासरी यांचे म्हणणे आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले,‘शिवसेनेतर्फे हा उत्सव पंधरा वर्षापासून साजरा केला जातो, त्याच शिवसेनेत आम्ही आहोत. आम्ही कुणावरही दबाव आणून परवानगी मागितली नाही. विनाकारण प्रशासनावर आरोप करून कारण नसताना प्रसिद्धी मिळवण्याचा आरोप कोणी करू नये.’
Mumbai Kalyan Politics Shivsena Thackeray Shinde Dahi Handi
Festival Celebration