मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलींचा वस्तू म्हणून वापर करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. एकविसाव्या शतकातही मुलींचा वापर वस्तू म्हणून केला जात असून त्यांना नफ्याचे साधन बनवले जात असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एक वर्षाच्या मुलीला विकल्याच्या प्रकरणात एका महिलेला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या एकल खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, आर्थिक फायद्यासाठी आईने तिच्या एका वर्षाच्या मुलीला विकणे हे नैतिकता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. या प्रकरणी मूल विकत घेतलेल्या अश्विनी बाबर (४५) या महिलेला सातारा पोलिसांनी गेल्या वर्षी अटक केली होती, तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने आरोपी महिलेला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
न्यायालयाने म्हटले की, आरोपी महिलेला तुरुंगात ठेवण्याची गरज नाही. आरोपी महिलेला स्वतः दोन अल्पवयीन मुले आहेत, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
पीडितेने आरोपी महिलेकडून कर्ज घेतले होते, अॅडव्हान्स भरण्यास उशीर झाल्यामुळे तिने एक वर्षाच्या मुलीला अश्विनी बाबरला विकले होते. नंतर पीडित महिलेने कर्जाची परतफेड केली असता आरोपी महिलेने मुलगी परत देण्यास नकार दिला. यानंतर पीडित महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार केली, त्यानंतर मूल तिच्या आईकडे परत आले.
न्यायालयाने म्हटले की, ‘आजच्या काळातही लहान मुलीला तिच्याच आईकडून विकले जाते, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.’ हे नैतिकता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
Mumbai High Court on Mother Sale Daughter for Money