मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपा महिला मोर्चातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनी गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी सकाळी ९.०९ मिनिटांनी ९० महिलांनी नऊवारी नेसून अभिनव पद्धतीने योगासने सादर केली. भारताचा समृद्ध ठेवा योगसाधनेचे महत्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्राचा पारंपरिक पेहराव नऊवारी नेसून याप्रसंगी ९ पॉवर योगासने सादर केली, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष व या कार्यक्रमाच्या प्रदेश संयोजक चित्रा वाघ यांनी दिली. यावेळी भाजपा सोशल मीडिया प्रदेश प्रभारी श्वेता शालिनी व महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी उपस्थित होत्या. योग प्रशिक्षक संजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
श्रीमती वाघ म्हणाल्या की, धकाधकीच्या जीवनात निरोगी व तणावमुक्त रहाण्यासाठी योगसाधना गरजेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारताचा समृद्ध ठेवा असलेल्या योगसाधनेला जगभरात पोहोचवले आणि त्यांच्या संकल्पनेतून जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबवल्या जाणा-या उपक्रमाअंतर्गत यंदा २१ जून रोजी योगदिनानिमित्त सर्व विधानसभा व लोकसभा मतदारसंघांमध्ये या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही श्रीमती चित्रा वाघ यांनी सांगितले. योग रील स्पर्धा यासह विविध कार्यक्रमांमध्ये राज्यभरातील भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.