मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रुग्णवाहिकेची स्पर्धा ही कायमच वेळेशी असते. रुग्णवाहिका रुग्णापर्यंत लवकर पोहचणे आवश्यक आहेच. पण, रुग्णाला घेऊन जाणारी गाडी दवाखान्यात वेळेच्या आत पोहचणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडल्याने शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांच्या मृत्यूने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सूर्यकांत देसाई यांची शुक्रवारी अचानक प्रकृती बिघडली. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली. देसाई यांना ज्या रूग्णालयात नेण्यात येत होते ती रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडली. रुग्णवाहिकेला धक्का देऊन झाला. पण, गाडी सुरू झाली नाही. दुसऱ्या रूग्णवाहिकेतून देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
देसाई यांच्या मृत्यूने संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फिटनेस टेस्ट न करता रुग्णवाहिका चालविण्यात येत असल्याचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. या निमित्ताने राज्यभरातील रुग्णवाहिकांची फिटनेस टेस्ट करण्यात यावी, तसेच ज्या गाड्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरतील त्या सेवेतून बाद करण्यात याव्यात, अशीदेखील मागणी होऊ लागली आहे.
सूर्यकांत देसाई हे १९९५ ते २००० या कालावधीत लालबाग परळ मतदारसंघातून आमदार होते. मागच्या २३ वर्षांपासून देसाई हे डोंबिवली पश्चिम भागात असलेल्या काशीकुंज सोसायटीमध्ये राहात होते. भागशाळा मैदानाजवळ ही इमारत आहे.
Mumbai EX MLA Death Due to Ambulance