मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईकरांसाठी अतिशय चिंतानजक बातमी आहे. कारण, मुंबईत भेसळयुक्त दूधाचा पुरवठा होत आहे. पोलिसांनी तब्बल १ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे दुधात चक्क दूषित पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या शाहूनगर धारावी परिसरात पोलिसांनी दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. शहरामध्ये नामांकित कंपनीच्या दुधामध्ये अशुद्ध पाणी भरून भेसळयुक्त दुधाची विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सी बी कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखेने ६ जणांना अटक केली आहे. या कारवाईत १ हजार १० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. या जप्त केलेल्या भेसळयुक्त दुधाची किंमत ६० हजार ६०० रुपये इतकी आहे.
शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळनगर येथे झोपडपट्टीत काही घरांमध्ये गोकुळ, अमूल या नामांकित कंपनीच्या दुधात अशुध्द पाणी भरून नागरीकांना विक्री करीत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली होती. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने ए. के. गोपाळनगर, संत कबीर मार्ग, ६० फुटी रोड, धारावी येथे एकून ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात दुधाच्या भरलेल्या पिशव्या व अस्वच्छ वापरलेल्या रिकाम्या पिशव्या तसेच भेसळयुक्त दुधाने भरलेल्या प्लॅस्टीकच्या बादल्या, पेटत्या मेणबत्त्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टीकचे नरसाळे इ. साहित्य मिळाले. . त्यापैकी काही पिशव्या हातात घेवून त्याची पाहणी केली असता, त्या पिशवीचे कोपऱ्यावर असलेल्या सीलच्या ठिकाणी कापलेल्या दिसून आल्या. त्यात अशुध्द पाणी भरून दूधात भेसळ करीत असल्याचे समोर आले.
सदर कारवाई दरम्यान घरामध्ये गोकुळ, अमूल या नामांकित कंपनीचे सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे एकूण १ हजार लिटर भेसळयुक्त दूध मिळाले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनाम्याअंतर्गत परिक्षणासाठी नमुने घेण्यात आले असून छापा कारवाईमध्ये ६ भामट्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आता मुंबईच्या अन्य भागात तसेच उपनगरातही अशाच प्रकारची धडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या कारवाईत अनेक जणांचे भेसळीचे कारनामे उघडे पडतील असे सांगण्यात येते.
Mumbai Duplicate Milk Racket Burst by Police 6 Arrested