मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लिव्ह इन रिलेशनशिपची आणखी एक वेदनादायक घटना काळबादेवी येथील फणसवाडी परिसरातून समोर आली आहे. जिथे १८ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गीता अजित विरकर (वय ५४ वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. तिचा लिव्ह-इन रिलेशनशिप पार्टनर महेश विश्वनाथ पुजारी (वय ६२ वर्षे) आहे. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्यावर अॅसिड हल्ला केला.
गेल्या १३ जानेवारी रोजी पुजारीने महिलेवर अॅसिड हल्ला केला होता. अॅसिड हल्ल्यात महिला ५० टक्के भाजली होती. महिलेचा प्रियकर पुजारी याने तिच्याकडे जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. महिलेने नकार दिल्यावर पुजारीने तिच्यावर सल्फ्युरिक अॅसिडने हल्ला केला. ज्यात ही महिला भाजली होती.
गीता अजित विरकर यांचा मुलगा आदित्य याने घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली होती. त्याने सांगितले की, १० जानेवारी रोजी पुजारीचा माझ्या आईसोबत वाद झाला. त्यामुळे १३ जानेवारी रोजी पुजारीने गीतावर अॅसिडने जीवघेणा हल्ला केला. दोघेही गेल्या २५ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
मुलगा आदित्य याने सर्वप्रथम गीताला भाटिया रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेवर तब्बल १८ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते अखेर तिची प्राणज्योत मालवली आहे.
Mumbai Crime Live In Relationship Acid Attack on Women Death