मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, आज दिवसभरात तब्बल २० हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद मुंबईमध्ये झाले आहे. तर, राज्यात आज दिवसभरातील बाधितांचा आकडा ३६ हजार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे दिसून येत आहे.
दिवसभरामध्ये २० हजार बाधितांची नोंद झाली तर मुंबईत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले होते. आज मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २० हजार १८१ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत वेगाने लसीकरण होऊनही बाधितांचा टक्का वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. मुंबईतील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय झाली आहे. याची दखल घेत मुंबई महापालिकेच्या परवानगीशिवाय खासगी हॉस्पिटलला कोरोना बाधितांना बेड देता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता मुंबईत लॉकडाऊन लागणार की आणखी काही निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1479101298133721093?s=20
राज्यातील कोरोना संसर्गाची स्थितीही चिंताजनकच आहे. आज दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात जवळपास ९ हजार कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ३३ हजार १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.०८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ५ लाख ८५ हजार ७५८ व्यक्ती घरीच विलगीकरणात तर १३६८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज दिवसभरात ७९ नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या अशी
१ जानेवारी – ९ हजार १७०
२ जानेवारी – ११ हजार ८७७
३ जानेवारी – १२ हजार १६०
४ जानेवारी -१८ हजार ४६६
५ जानेवारी – २६ हजार ५३८