मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुरु असलेली सोन्याच्या तस्करीची साखळी डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे उध्वस्त केली. या सिंडीकेटशी कथितरित्या संबंधित असलेल्या दोन भारतीय प्रवाशांतर्फे भारतात होणाऱ्या सोन्याच्या तस्करीला अटकाव करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
१५ मे २०२३ रोजी एमिरेट्स कंपनीच्या ईके ५०० या विमानाने दुबई येथून भारतात येणाऱ्या दोन प्रवाशांवर नजर ठेवण्यात आली. विमानाने मुंबईत उतरल्यावर या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची तपशीलवार चौकशी तसेच शारीरिक तपासणी करण्यात आली. तपासणीअंती या दोघांकडे काळ्या टेपने बेमालूमपणे गुंडाळलेल्या चार प्लास्टिक पाकिटांमध्ये लगद्याच्या स्वरूपातील लक्षणीय प्रमाणातील सोने लपवलेले आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या या सोन्याचे एकूण वजन ३५३५ ग्रॅम असून त्याची किंमत २.२३ कोटी इतकी आहे.
पुढील चौकशीअंती असे दिसून आले की, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती दुबईबाहेर कार्यरत असणाऱ्या आणि दररोज मोठ्या प्रमाणातील सोन्याची तस्करी करण्यात सहभागी असलेल्या कुप्रसिद्ध सिंडीकेटचे सदस्य आहेत. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे सोने जप्त करण्यात यश आले आहे.यामुळे तस्करी करणाऱ्या सिंडीकेटच्या बेकायदा कारवायांवर परिणामकारकरित्या चाप बसला आहे. दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
या यशस्वी कारवाईतून सोने तस्करीच्या घटनांना प्रतिबंध करण्याविषयी डीआरआयच्या अधिकाऱ्यांची अथक कटिबद्धता दिसून येते.विविध पद्धतींनी देशात होत असलेली सोन्याची तस्करी रोखण्यासाठी परिश्रम करताना कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी दररोज ज्या आव्हानांना सामोरे जातात त्याचे,ही कारवाई म्हणजे उत्तम उदाहरण आहे.
Mumbai Airport Gold Smuggling Syndicate Burst