मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळपासून आर्थिक राजधानी मुंबईत छापासत्र सुरू केले आहे. तब्बल १५हून अधिक ठिकाणांवर ईडीचे पथक दाखल झाले आहे. मुंबई महापालिकेच्या किोविड घोटाळ्याशी संबंधीत ही छापेमारी असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित काही जणांवर छापे पडल्याचे वृत्त आहे. या छाप्यांमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
अनेक दिवसांनंतर मुंबईत पुन्हा ईडी सक्रीय झाली आहे. आता निमित्त आहे ते कोविड काळातील मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्याचे. ईडीच्या पथकांनी मुंबईतील १५ पेक्षा अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे पथक या सर्व ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी तपासणी सत्र सुरू केले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित सुजित पाटकर यांच्या संलग्न १० ठिकाणांवर ईडीने छापा टाकल्याचे सांगितले जात आहे.
कोविड काळात कुणाकुणाला कशाचे कंत्राट देण्यात आले होते, तसेच, कोविडशी संबंधित साहित्य, सामग्री पुरवठादार, कोविडमध्ये विविध सेवा उभारणारे, देणारे यासह इतरांवर आजचे हे छापासत्र असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाशी निगडीत व्यक्ती खासकरुन टार्गेट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ईडीने यापूर्वीच तत्कालिन महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची चौकशी केली आहे. आजच्या छाप्यांमध्ये तत्कालिन अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निवासस्थानीही ईडीचे पथक दाखल झाले आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानाही ईडीचे पथक दाखल आहे. चव्हाण हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जवळचे असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या छाप्यांबाबत अधिकृत माहिती ईडीने दिलेली नाही. तसेच, ठाकरे गटाच्या नेत्यांनीही याबाबत आपली प्रतिक्रीया दिलेली नाही.