इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचे आहे. वेळोवेळी ते देवदर्शनासाठी जाऊन भरीव देणग्याही देतात. महाशिवरात्रीनिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातच्या सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यांचा मुलगा आकाश अंबानीही सोबत होता. दोघांनीही सोमनाथ मंदिरात रुद्राभिषेकही केला. यावेळी अंबानी कुटुंबातर्फे सोमनाथ मंदिर ट्रस्टला १.५१ कोटीची देणगीही दिल्याची चर्चा आहे. पण, त्याला अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकला नाही.
दर्शनासाठी आलेले मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योगेंद्र देसाई यांनी स्वागत केले. दोघांचेही मंदिर ट्रस्टतर्फे शाल व चंदनाचे लेप देऊन स्वागत करण्यात आले. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ महादेवाची विधिवत पूजा केली आणि त्यांनी भोलेनाथाचा रुद्राभिषेकही केला. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात मुकेश अंबानी फिकट गुलाबी तर आकाश अंबानी फिकट निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहेत. फोटोवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक
गुजरातचे प्रसिद्ध सोमनाथ मंदिर देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि. या मंदिराला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. सोमनाथ मंदिराबाबत हिंदूंची धार्मिक श्रद्धा आहे आणि भोलेनाथाच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वेरावळ या प्राचीन बंदराजवळ गुजरातमधील गीर जिल्ह्यात सोमनाथ मंदिर आहे.
Mukesh Ambani Family Somnath Temple Puja Donation