नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोग्य क्षेत्रात संशोधनासाठी डेटा सायन्सचे महत्व प्रचंड असून आपल्या देशामध्ये मोठया प्रमाणात डेटाची उपलब्धता आहे त्याचे सुयोग्य पध्दतीने वर्गीकरण आणि विश्लेषण केल्यास त्याचा समाजातील आरोग्य समस्या सोडवण्यासाठी लाभ करुन घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प, अ.वि.से.प., वि.से.प, यांनी केले.
विद्यापीठात वर्कशॉप ऑन डेटा सायन्स इन हेल्थकेअर फॉर एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड पब्लिक हेल्थ विषयावर कार्यशाळा व हावर्ड युनिव्हर्सिटी, सी-डॅक आणि ओमनीक्युरस संस्थांसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत व्यासपीठावर मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, हावर्ड विद्यापीठाच्या आय टू बी टू ट्रानस्मार्ट फांऊन्डेशनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कविश्वर वाघोलीकर, सी-डॅकचे कार्यकारी संचालक श्री. विवेक खनिजा, ओमनिक्युरस संस्थेच्या प्रतिनिधी श्रीमती सौम्या जयकृष्णन, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात काम करतांना अचूक उपचार होणे गरजेचे असते. यासाठी रुग्णांची आजासंबंधी माहिती व त्याचे पृथ्थकरण करणे आवश्यक असते. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन संकलीत माहितीवर कमी वेळात प्रक्रिया करणे शक्य आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधन कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने तंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. यामाध्यमातून संशोधन व सामाजिक आरोग्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून अनेक अद्यायावत तंत्रज्ञान व सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे कमी वेळात अधिक रुग्णांना आरोग्यसेवा देणे सुकर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा तंत्रज्ञान व संशोधन संशोधन संदर्भातील सामंजस्य करार उपक्रम महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्राशी निगडीत माहिती व विश्लेषणाची अत्यंत गरज असून यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसंख्येच्या डेटाचा वापर व्यापक प्रमाणावर संशोधनासाठी होईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाचा संशोधन व आरोग्य शिक्षणासाठी मोठया प्रमाणात उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या सामंजस्य करारामुळे संशोधन करण्यासाठी लागणारा डेटा सुकररित्या उपलब्ध होईल. आरोग्य क्षेत्रात काम करणाÚया व्यक्तींनी डेटा सायन्स संदर्भात मोठया प्रमाणात संशोधन करावे असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे डेटा सायन्स इन हेल्थकेअर फॉर एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड पब्लिक हेल्थ विषयावर कार्यशाळा महत्वपूर्ण आहे. संशोधन व आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्रित येऊन काम केल्यास समाजाला त्या मोठया प्रमाणत उपयोग होईल असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत हावर्ड विद्यापीठाच्या आय टू बी टू ट्रानस्मार्ट फांऊन्डेशनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कविश्वर वाघोलीकर यांनी डेमो ऑफ क्युराटेड डेटा सर्च पोर्टल टू अॅडव्हांस हेल्थकेअर विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, आरोग्य क्षेत्रात गुणवत्ता आधारित काम गरजेचे आहे यासाठी मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. रुग्णांच्या तपासणीनंतर त्याच्या आरोग्यासंबधी इतिहास, रुग्णांची संख्या, वय, प्रदेश, उपचार पध्दती यांची संकलित माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. संशोधनासाठी हा डेटा महत्वपूर्ण असून त्यावर काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. विद्यापीठासमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून संशोधनाला नवी दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी व संशोधन संस्थेचे प्राध्यापक डॉ. अभिनंदन जाधव यांनी इम्लिमेंटेशन इन सिव्हिल हॉस्पिटल विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा मोठया प्रमाणात वापर वाढला आहे. यामुळे डॉक्टरांना जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी कमी वेळेत करता येते. रोगाचे निदान करण्यासाठी लागणारा कालावधी कमी झाला आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आरोग्यसेवा क्षेत्रात केल्यास प्रभावी बदल घडतील असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन अध्यासनाच्या चेअर प्रोफेसर डॉ. पायल बन्सल यांनी युसिंग रेकॉर्डस् सर्चिंग पोर्टल फोर एज्युकेशन विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, संशोधनासाठी डेटा उपलब्ध असणे गरजेचे आहे. कॉम्प्लीमेंटरी बेस एज्युकेशनच्या धर्तीवर शिक्षण आवश्यक आहे. आरोग्य शिक्षणात डिजिटल उपकरणांचा वापर मोठया प्रमाणात करणे गरजेचे आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. संशोधन उपक्रमांच्या माहितीचा प्रचार व प्रसार होणे गरचेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हावर्ड विद्यापीठाचे मॅसच्युसेट जनरल हॉस्पिटलच्या न्युरोलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ. शॉन मर्फी यांनी स्टेटस इन ग्लोबल नॉर्थ विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, आरोग्य क्षेत्रातील माहितीशी संबधित कामासाठी हावर्ड विद्यापीठाची आय टू बी टू ट्रानस्मार्ट फांऊन्डेशन संस्था महत्वपूर्ण कार्य करते. विविध प्रकारची माहितीचे संकलन व त्यावर संशोधन कार्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्यात येते. प्राप्त माहिती विशिष्ट पध्दतीत गोपनीय ठेवण्यात येते. कोविडच्या काळात जमा करण्यात आलेली माहिती उपचार पध्दती शोधण्यासाठी महत्वपूर्ण ठरली. विविध विषयावरील माहितीवर इंटरनेट व सॉफ्टवेअरच्या सहयाने प्रक्रिया करणे सुलभ झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांच्या हस्ते सामंजस्य करार पत्राचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले ऑनलाईन उपस्थित होते. हावर्ड विद्यापीठाच्या आय टू बी टू ट्रानस्मार्ट फांऊन्डेशनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कविश्वर वाघोलीकर, सी-डॅकचे कार्यकारी संचालक श्री. विवेक खतिजा, ओमनिक्युरस संस्थेच्या प्रतिनिधी श्रीमती सौम्या जयकृष्णन यांच्याकडे साक्षांकित करण्यात आलेले सामंजस्य करारपत्र प्रदान करण्यात आले.
विद्यापीठाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन अध्यासनाच्या चेअर प्रोफेसर म्हणून डॉ. पायल बन्सल यांना आरोग्य मा. कुलगुरु महोदया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेच्या अंतीम सत्रात कार्यक्रमास उपस्थित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षक व अभ्यागतांनी तज्ज्ञांसमवेत विस्तृत चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. डॉ. चित्रा नेतारे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, सहायक संचालक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, श्री. जितेंद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी व संशोधन संस्थेचे शिक्षक, विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.
MUHS MOU with Harvard University Features