नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय केंद्राचे उद्घाटन व पुणे येथील जीनहेल्थ लॅब ओपीडी सेवांचा शुभारंभ ऑनलाईन पध्दतीने तसेच संगम-2023 आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेशजी बैस यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 02 जून 2023 रोजी आय.आय.टी. पवई येथे होणार आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार श्री. गिरीष महाजन, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, आय.आय.टी. पवईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी नगर येथील मुकंुद नगर परिसरात सुमारे पंधरा हजार चौरस फुटात विद्यापीठाचे नवीन विभागीय केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्रामार्फत डिप्लोमा इन ऑप्थाल्मिक सायन्स, ऑप्टोमेट्री हा पदविका अभ्यासक्रम व बी.एस्सी. ऑप्टोमेट्री हा पदवी अभ्यासक्रम शिकण्यात येणार आहे.
या इमारतीमध्ये नेत्ररुणांसाठी ओपीडी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचा नेत्र रुग्णांना उपयोग होणार आहे. विद्यापीठाच्या नवीन इमारतीत प्रशासकीय कामकाजा करीता कार्यालय, वर्ग खोल्या, केंद्रीय मूल्यांकन सुविधा करीता स्ट्रॉंगरुम, ग्रंथालय, ऑडिटोरियम हॉल आदी सुविधांनी सज्ज आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, पुणे येथील शिवाजी नगर परिसरातील स्वर्गीग डॉ. के.सी. घारपुरे यांच्या पुरातन बंगल्याचे नुतनीकरण करुन जीन हेल्थ लॅब सुरु करण्यात आले आहे. या लॅबव्दारा कर्करोग आणि अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांसाठी नाममात्र शुल्कात निदान सुविधा देण्यात येणार आहेत. कर्करोग आणि अनुवांशिक विकारांचे निदान करण्यासाठी चिकित्सकांना जीन हेल्थ लॅबव्दारा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जीन हेल्थ लॅबव्दारा राज्यभरातील सेवा नसलेल्या रुग्णांना अनुवांशिक रोगांविषयी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे संभाजी नगर विभागीय केंद्राचे उद्घाटन व पुणे येथील जीन हेल्थ लॅबचा शुभारंभ मा. राज्यपाल यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ मॅनेजमेंट इन पोस्ट कोविड-19 वर्ड संकल्पनेवर ‘संगम-2023 (Summit of Academia Networking with Government, Allied Health & Medical Professionals Conference on Health Systems Research & Innovation) आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत साथीच्या आजारांचा वैज्ञानिक पाया, पुराव्यावर आधारित धोरण, डेटा विश्लेषण, आरोग्य प्रणालीतील नवकल्पना आणि उपकरण डिझाइन चर्चा करण्यात करण्यात येणार आहे.
कोविड-19 साथीच्या आजारानंतर जगभरात शाश्वत, लवचिक आरोग्य प्रणाली तयार करण्यावर आणि प्रचलित आणि संभाव्य आरोग्य सेवा आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणे लागू करण्यावर भर देत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य तज्ज्ञ आणि संस्था यांनी एकत्र येण्यासाठी संगम-2023 हे व्यासपीठ महत्वपूर्ण आहे. संगम-2023 परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सेवा, आरोग्य प्रणाली, साथीचे रोगांविषयी शास्त्रीय माहिती, सार्वजनिक आरोग्य धोरण, आरोग्य सेवेसाठी भूस्थानिक प्रणाली, हवामान बदलाचे परिणाम आदी बाबत माहिती व वैद्यकीय चिकित्सक, माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाचे छत्रपती संभाजी नगर विभागीय केंद्रामुळे समाजाला शिक्षण व नेत्ररोग सेवा याकरीता मोठा उपयोग होणार आहे. जीन हेल्थ लॅबव्दारा अत्यल्प खर्चात तपासणी व मार्गदर्शन मिळणार असल्याने विद्यापीठाचे उपक्रम महत्वाकांक्षी असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्या येत आहेत. मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन विद्यापीठ लवकरच जागतिक स्तरावर नावलौकिक करेल असे त्यांनी सांगितले.
MUHS Health Facilities Sambhajinagar Pune