मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. सरकारी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता झाला असून, एसटी कर्मचाऱ्यांना अजून २८ टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत आहे. हा भत्ताही कधी मिळतो याची प्रतीक्षा एसटी कर्मचाऱ्यांना लागली आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे नुकतेच एक पत्र दिले आहे. या पत्रात एसटी कर्मचाऱ्यांविषयी मागण्या केल्या आहेत. यामध्येच महागाई भत्त्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे हे आहेत. पूर्वी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष असे चार स्तर असायचे व फाईल मंजुरीसाठी खूप वेळ लागायचा. आता मुख्यमंत्र्यांकडेच कारभार असल्याने फायदा होईल, अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच प्रलंबित महागाई भत्ता तत्काळ मिळण्यासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना भरीव आर्थिक मदत न देता सरकारचा ठिगळे लावण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला होता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी फक्त ४५ कोटींची तरतूद केली असल्याचे ते म्हणाले होते. हा ठिगळे लावण्याचा प्रकार असून यातून फार काही साध्य झाले नसल्याच बरगेंनी म्हटलं आहे. तसेच कमी निधी प्राप्त झाल्यानं हक्काचा महागाई भत्ता मिळाला नसल्याचेदेखील ते म्हणाले होते.
MSRTC ST Bus Employee Dearness Allowance