मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) संयुक्ता गट-ब आणि गट –क संवर्गातील ८,१६९ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी विभाग व प्राधिकारीनिहाय कट ऑफ लावण्यात येणार आहे. याप्रकाराने एकाच विद्यार्थ्याची विविध प्राधिकरणावर वारंवार निवड होऊन अन्य हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. या नियमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालिचा संताप व्यक्त होतो आहे.
आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती राज्यातील बेरोजगार तरुणांच्या सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, नियमातील गोंधळामुळे विद्यार्थीसुद्धा पुरते गोंधळून गेले आहेत. एमपीएससीच्या जाहिरातीनुसार एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग किंवा प्राधिकरण आहेत. यात अन्न व पुरवठा विभागात सर्वाधिक म्हणजे ११५३ जागा आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून निवड करू शकतात. त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक विभागांसाठी अर्ज करणार हे निश्चित आहे.
आयोगाकडून सर्व विभागातील लिपिक-टंकलेखक पदसाठी समान पूर्व परीक्षा घेणार आहे. मात्र, त्यांची गुणवत्ता यादी राज्यनिहाय जाहीर न करता ती विभागनिहाय जाहीर होणार आहे. परिणामी, गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी हे त्यांनी अर्ज केलेल्या सर्वच विभागामध्ये पात्र ठरतील. यामुळे त्यांच्या खालोखाल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेतूनच बाद केले जाणार असल्याने त्यांना मुख्य परीक्षेची संधीच मिळणार नाही, अशी विद्यार्थ्यांना भीती आहे.
नोकरीची संधीच हिरावला जाणार
राज्यस्तरीय गुणवत्ता यादी लावल्यास ७,०३४ लिपिक पदांच्या मुख्य परीक्षेसाठी उदाहरणादाखल १२ च्या गुणोत्तराने अंदाजे ८४,४०८ विद्यार्थी पात्र होतील. परंतु, आताच्या प्राधिकरणनिहाय पात्र करण्याच्या निर्णयामुळे, अंदाजे १५-२० हजार उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येण्याची शक्यता आहे. पूर्व परीक्षा ही केवळ चाळणी परीक्षा असून मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारेच अंतिम निवड यादी लागणार आहे. परंतु, चाळणी परीक्षेतच हजारो विद्यार्थ्यांच्या नोकरी मिळवण्याच्या संधी हिरावून घेण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
MPSC New Rule Student Main Exam Threat