नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वे लोहमार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षात पासून प्रलंबित आहे. या प्रकल्पाला राज्य आणि केंद्राची मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य आणि केंद्राने या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे मार्गाला मंजुरी दिलेली असली तरी केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. यामुळे नाशिककरांसाठी महत्त्वकांशी असलेला प्रकल्प रेंगाळला आहे. तरी आपण तातडीने सदर हायस्पीड रेल्वे मार्गाला अंतिम मान्यता द्यावी असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना घातले आहे.
नाशिक -पुणे मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा लोहमार्ग असल्यामुळे पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु नासिक – पुणे थेट लोहमार्ग नसल्याने त्या तुलनेने नाशिकचा विकास मंदावलेला आहे.यातूनच नासिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग व्हावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे सतत प्रयत्नशील आहेत.यासाठी गोडसे यांनी वेळोवेळी संसदेमध्ये आवाज उठवून या लोहमार्गाचे सर्वेक्षण करून घेतले आहे. प्रस्तावित नासिक – पुणे लोहमार्गास राज्य आणि केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे .या प्रकल्पासाठी सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पैकी राज्य आणि केंद्र प्रत्येकी २०% तर इक्विलिटी मधून ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे.
नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता आणि निधी उपलब्धतेचे प्रश्न मार्गी लागून आणि केद्रांच्या वित्त विभागाची मंजुरी मिळूनही वर्ष उलटले तरीही केंद्राकडून अद्यापपावतो अंतिम मंजुरी मिळालेली नाही.यामुळे तमाम नाशिककरांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.नाशिक – पुणे हा रेल्वेमार्ग नासिक, नगर, पुणे या तीन जिल्हयांमधून जाणार असल्याने या लोहमार्गामुळे नासिक – नगर -पुणे या शहराचे दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यातूनच पुणे शहरासारखाच नाशिकचाही झपाट्याने विकास होणार आहे.नाशिक -पुणे लोहमार्ग हा नाशिककरांसाठी एक वरदानच ठरणार असून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे आज खासदार गोडसे यांनी नामदार अश्विनी वैष्णव यांना पटवून दिले.नाशिकच्या विकासाची चक्र वेगाने फिरविण्यासाठी नासिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशी गळ यावेळी खासदार गोडसे यांनी नामदार अश्विनी यांना घातली.
MP Hemant Godse Letter on Nashik Pune High Speed Railway