पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आई आणि मुलाचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे असते तसेच आपल्या मुलांवर मातेचे जीवापाड प्रेम असते. कोणतीही आई आपल्या मुलांसाठी नेहमीच काळजी घेत असते. परंतु आजच्या काळात जणू काही नाती ही व्यवहारिक झाली आहेत, अनेक ठिकाणी मुले ही आपल्या सख्या आईला सांभाळत नाहीत, त्यांना आपली जन्मदात्री माताच नकोशी वाटते. त्यातून अनेक वाईट आणि अमानुष घटना घडत असतात.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैजयंता नावाच्या वृद्ध महिलेला तिचा मोठा मुलगा दिलीप याने राहत्या घरात बेदम मारहाण केली, तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारल्याने ती महिला जमिनीवर कोसळली. मुलाने अशा प्रकारे अमानुषपणे आईला मारहाण केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजंयता जाधव यांनी आपल्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या धक्कादायक प्रकरणात पेन्शन लाटण्यासाठी छळ केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतची तक्रार वैजंयता जाधव यांनी नुकतीच दिली आहे. मात्र ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून वैजंयता यांना चक्कर येऊ लागल्याने त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, इंदापूर पोलिसांनी संबंधित आरोपीच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे. परंतु मुलाने आईला मारहाण केली, याची नेमकी माहिती मिळाली नाही. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु परिसरात या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे.