नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिक शहर व जिल्ह्यातील टूजी आणि थ्रीजी बेस ट्रान्समीटर स्टेशन फोर जी मध्ये अपग्रेड करण्यास केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक शहर आणि जिल्ह्यातील नेटवर्क सुविधा होणार अधिक सक्षम होणार आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक शहर आणि जिल्ह्यातील नेटवर्क सुविधा होणार अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दि.२ जानेवारी २०२५ रोजी नाशिकमधील सर्व 2G आणि 3G बेस ट्रान्समीटर स्टेशन (Base Transmitter Stations – BTS) ला 4G मध्ये अपग्रेड करण्याची मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नाशिकमधील सर्व 2G आणि 3G बेस ट्रान्समीटर स्टेशन (Base Transmitter Stations – BTS) ला 4G मध्ये अपग्रेड करण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे केवळ इंटरनेट वेगच सुधारणार नाही तर शहरातील डिजिटल कनेक्टिव्हिटी, उद्योगधंदे, स्टार्टअप्स, विद्यार्थी, व्यापारी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे. विशेषतः २०२७ कुंभमेळ्यादरम्यान नेटवर्क ट्रॅफिक वाढल्यासही अखंड सेवा उपलब्ध होणार आहे. हा निर्णय नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, भविष्यात 5G आणि अधिक प्रगत तंत्रज्ञानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासही मदत होणार असून आधुनिक नाशिकच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.