पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या रोखठोक राजकीय भूमिकेसाठी ओळखले जातात. कधी विरोधकांसोबत भेटींमध्ये रमलेले असतात तर कधी सत्ताधाऱ्यांसोबत. पण जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा ते कुणालाच सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी जेवढे कौतुक केले, तेवढीच त्यांच्यावर टिकाही केली आहे. अलीकडेच जागतिक मराठी संमेलनात राज यांनी पुन्हा एकदा याची प्रचिती दिली.
पुण्यात झालेल्या जागतिक मराठी संमेलनात राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या बाबतीत रोखठोक मत व्यक्त केलं. ‘खरं तर महाराष्ट्रातून एखादा प्रकल्प बाहेर गेला म्हणून महाराष्ट्राचं काही नुकसान होत नाही. जे आपल्याकडे आहे, ते टिकवून ठेवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. देशात अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. अश्यात महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेला म्हणून रडण्याचं काही कारण नाही. पण पंतप्रधानांनी आपलं गृहराज्य आहे म्हणून गुजरातेत सगळे प्रकल्प न्यावे, हे अपेक्षित नाही. कारण पंतप्रधान एका विशिष्ट्य राज्याचे नाहीत, ते देशाचे पंतप्रधान आहेत,’ असे राज ठाकरे म्हणाले. देश एकसंध ठेवायचा म्हणता, तर तो असा एकसंध ठेवणार आहात का, असा सवालही त्यांनी केला.
कौतुकही करतो
चांगल्या कामांचे कौतुक करतो आणि वाईट कामांवर टिका करतो. मी असाच आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. सरकारने चांगली कामे केली तर त्याचे सर्वांनीच कौतुक केले पाहिजे. मी तर जाहीरपणे सरकारचं चांगल्या कामांसाठी अभिनंदन करत असतो, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक राज्य समान
देशातील प्रत्येक राज्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नजरेतून बघितले पाहिजे. त्यांच्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे. आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातचाच विचार करणे, हे देशाच्या पंतप्रधानांना शोभणारे नाही, असे स्पष्ट मत राज यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातचा औद्योगिकदृष्ट्या केलेला कायापालट किती उत्तम आहे, हे राज सातत्याने आपल्या भाषणातून सांगायचे, हे महत्त्वाचे.
MNS Chief Raj Thackeray On on PM Narendra Modi
Pune Pimpri Chinchwad Politics