मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देशभरात मोठी चर्चा होत आहे. ज्या मशिदींवर भोंगे सुरू आहेत तेथे हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज यांनी मनसैनिकांना दिले आहेत. या प्रश्नी मोठा वादही निर्माण झाला आहे. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे. राज यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आता मनसेने पक्षासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अधिकृत भूमिका प्रसार माध्यमांमध्ये मांडण्याचे काम पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रवक्ते करीत असतात. पक्षाचे वरिष्ठ व प्रवक्त्यांव्यतिरीक्त इतर कोणीही प्रसार माध्यमांमध्ये राजकीय भूमिकांबाबत भाष्य करु नये. तसेच, पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर वा अन्यत्र कुठेही राजकीय टीका-टिपण्णी करताना भाषेचे भान बाळगावे. पक्षशिस्तीचे पालन प्रत्येक महाराष्ट्र सौनिकाला करावेच लागेल. अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा या आदेशात देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी…#MNSAdhikrut pic.twitter.com/iQGqrsLSVK
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 7, 2022