नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रक्षाबंधनानिमित्त देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांना एका भावाने निनावी खरमरीत पत्र पाठवले असून ते चांगलेच व्हायरल आहे. या पत्राची सर्वत्र चर्चा आहे. या पत्रात कमिशनकन्या म्हणून आरोपही करण्यात आला आहे. १३०० कोटींचा निधी तू मतदार संघात आणलास.. पण ताई एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचार खरेच त्या निधीतून झालेली विकास कामे उत्कृष्ट दर्जाची आहेत का…? ताई तू आमच्यासाठी विकासकन्या होतीस पण कधी कमिशनकन्या झालीस ते कळालच नाही असे म्हटले आहे.
हे संपूर्ण पत्र असे आहे….
प्रिय आमदार ताई, देवळाली विधानसभा मतदारसंघ
सप्रेम नमस्कार,
तू पाठवलेलं पत्र आणि राखी मिळाली. खूप आनंद वाटला आणि सोबत आश्चर्यही… कारण पाच वर्षांपूर्वी भक्कम पाठबळ देऊन, वर्गणी जमा करून, स्वतःच्या जीवाचं रान करून देवळाली मतदारसंघातून आम्ही ज्या बहिणीला विधानसभेत पाठवलं, त्या बहिणीला म्हणजे तुला पाच वर्षांनी का होईना तुझ्या भावांची आठवण आली. मागील पाच वर्षे तुझे भाऊ काय करतायेत. त्यांचं चांगलं चाललंय की वाईट. याची तुला कधीच आठवण नाही आली का ग ताई..
मागील पाच वर्ष ज्या भावांना तू तुझ्या कार्यालयात राखी बांधत होतीस, त्यांना लाखाची कंत्राट दिलीस आणि ज्या भावांनी खरच मेहनत घेऊन तूला आमदार केलं स्वतःच्या पैशाने गाडीत् पेट्रोल टाकून तुझे झेंडे घेऊन फिरले ते भाऊ तर बेरोजगारचं फिरत आहेत…तू म्हणालीस, की सुमारे १३०० कोटींचा निधी तू मतदार संघात आणलास.. पण ताई एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचार खरेच त्या निधीतून झालेली विकास कामे उत्कृष्ट दर्जाची आहेत का…? ताई तू आमच्यासाठी विकासकन्या होतीस पण कधी कमिशनकन्या झालीस ते कळालच नाही ग……
ते काहीही असू दे एका गोष्टीचा आनंद वाटतो की, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, पण तुला तुझ्या ठेकेदार भावांच्या गराड्यातून तुझा सामान्य भाऊ दिसलाच….ताई तू पाच वर्षे खूप कामे केलीस. मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर तू घडवलेस. पण ताई आता तुला आरामाची गरज आहे, आणि आम्हाला याची कल्पना आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही तुला आराम करण्याची संधी मिळवून देऊ…..
तुझाच
देवळाली मतदारसंघातील
मागील पाच वर्ष हरवलेला भाऊ