मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेश विसर्जनादरम्यान झालेला गोळीबार सदा सरवणकर यांनी केलेला नाही, असा अहवाल सादर करून मुंबई पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना क्लिन चिट दिली आहे. विशेष म्हणजे सरवणकर यांच्याच बंदुकीतील काडतुसे असले तरीही गोळीबार त्यांनी केलेला नाही, असे उत्तर विधीमंडळात देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाच्या विरोधात ठाकरे गटाने दंडच थोपटले होते. या घटनेनंतर मुंबईत दोन गट कधीतरी आमने सामने येतील आणि अघटित घडणार, याचा पूर्ण अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतरही काही दिवस पोलिसांची दोन्ही गटांवर करडी नजर होती. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या पोलिसांच्या नजरेतून नेमकी हीच घटना सुटली.
गणेश विसर्जनादरम्यान ठाकरे व शिंदे गट आमने सामने आले. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर झटपटही झाली. याच झटपटीत गोळीबार झाला. त्यावेळी आमदार सदा सरवणकर तिथेच उपस्थित होते. गोळीबार झाला त्यावेळी तिथे एकच बंदूक होती आणि त्यामुळे त्याच बंदुकीतून सरवणकरांनी गोळीबार केला आहे, असा आरोप करीत ठाकरे गटाने कारवाईची मागणी लावून धरली होती. पोलिसांनी दिलेल्या अहवालात गोळीबार झाल्याचे नमूद केलेले आहे, पण तो गोळीबार सरवणकर यांनी केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभादेवीतील घटना
प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनाची मिरवणुक निघाली होती. यावेळी ठाकरे व शिंदे गट आमने सामने आला होता. दोघांमध्येही वाद झाला आणि एकमेकांसोबत झटपट झाली. त्याचवेळी गोळीबार झाला. गोळीबार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतूनच झालेला आहे, पण तो सरवणकर यांनी केलेला नाही, असे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.
विधानपरिषदेत प्रश्न
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात विधान परिषदेेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि विक्रम काळे यांनी गोळीबाराचा प्रश्न उपस्थित केला. गोळीबारातील आरोपीवर कारवाई का झालेली नाही, असा सवाल करण्यात आला. त्यावेळी सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरातही, घटनास्थळावर सापडलेले काडतूस सरवणकरांच्या बंदुकीतील असले तरीही गोळीबार त्यांनी केलेला नाही, नमूद करण्यात आले आहे.
MLA Sada Sarvankar Firing Mumbai Police Investigation Report