मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “सत्तांतर झाले की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. त्यांच्या या वक्तव्यावर टिका केली जात आहे.
मराठा आरक्षणावरुन अनेक नेत सातत्याने चर्चा करत असतात, आपले मत व्यक्त करत असतात. सत्तेत आल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची पावले उचलली. यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. अशातच या सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांवर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसीमधून पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे”, असेही ते म्हणाले.
तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करताना विरोधकांना ज्या भाषेत सुनावले त्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळात दोन वेळा मराठा आरक्षण गेला, असा आरोपही तानाजी सावंत यांनी केला आहे. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचेही सावंत म्हणाले होते.
याबरोबरच, बीडमध्येही तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली होती.
Minister Tanaji Sawant Controversial Statement on Maratha Reservation