नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील सुकना लष्करी तळावर पारंपारिक शस्त्र पूजन केले. १२ ऑक्टोबर रोजी आयोजित या महत्त्वपूर्ण सोहळ्याद्वारे भारतीय लष्करात शस्त्रांचे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणारे साधन म्हणून सन्मान केला जातो.
संरक्षणमंत्र्यांनी कलश पूजेनं विधींना सुरुवात केली, त्यानंतर शस्त्र पूजन आणि वाहन पूजन केले. त्यांनी आधुनिक लष्करी उपकरणांवर, जसे की अत्याधुनिक शास्त्रास्त्राने सुसज्ज असलेले पायदळ, तोफखाना आणि संप्रेषण प्रणाली, मोबिलिटी मंच, तसेच ड्रोन प्रणाली आदींसाठी पूजा आणि प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाची सांगता जवानांशी संवाद साधून झाली.
आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनीदेशाच्या सीमांवर शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी लष्कराच्या सतर्कतेचं आणि महत्त्वपूर्ण भूमिकेचं कौतुक केलं. त्यांनी सांगितले की, विजयादशमी म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजय होय आणि सैनिकांकडे मानवी मूल्यांसाठी तीच श्रद्धा आहे.
“भारताने कधीही द्वेष किंवा तिरस्कारातून कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. आपली अखंडता आणि सार्वभौमत्वाचा अपमान केल्यास किंवा त्यांना धोका निर्माण झाल्यासच आम्ही लढतो; जेव्हा धर्म, सत्य आणि मानवी मूल्यांवर हल्ला केला जातो तेव्हाच आम्ही युद्ध करतो. हाच वारसा आपल्याला मिळाला आहे. आम्ही या वारशाचे रक्षण करणे सुरूच ठेवू. मात्र, आमच्या हितांना धोका निर्माण झाल्यास, आम्ही मोठे पाऊल उचलण्यास ही मागेपुढे पाहणार नाही. शस्त्र पूजन करण्यामागचे स्पष्ट संकेत हेच आहेत की, आवश्यकता भासल्यास शस्त्रे आणि उपकरणांचा पूर्ण शक्तीनं वापर केला जाईल,” असे रक्षा मंत्री म्हणाले.
या कार्यक्रमाला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, आगामी संरक्षण सचिव आरके सिंह, पूर्व कमानचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल राम चंदर तिवारी, सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघू श्रीनिवासन, त्रिशक्ती कोर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल झुबिन ए मिनवाला आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.