…आणि माझी राहण्याची व्यवस्था झाली
- प्रतिभा विश्वास (कीर्ती महाविद्यालय, दादर, मुंबई)
मराठी साहित्य संमेलनाची वैभवशाली परंपरा महाराष्ट्रात आहे. आणि एक मराठी भाषेची अभ्यासक ,प्राध्यापक आणि लेखक या नात्याने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी साहित्य संमेलन जिथे भरतात तिथे आवर्जून जाण्याचा प्रयत्न करते. 15 ते 18 जानेवारी 2016 दरम्यान 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड मध्ये भरले.
ते संमेलन अनेक कारणांमुळे गाजले ते संमेलनाध्यक्ष सबनीस यांच्या या काही विधानांमुळे. त्याचप्रमाणे संमेलनावरती होणाऱ्या खर्चामुळे. आणि या वादावादीत संमेलनाध्यक्षांना गप्प बसण्याची ताकीदच संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर पी. डी. पाटील यांनी दिली. ही बातमी जेव्हा वृत्तपत्रात वाचली तेव्हा अ.भा.सा. संमेलनाध्यक्षांना दम भरणारे हे डॉक्टर पी डी पाटील आहेत तरी कोण? यासाठी म्हणून मी पिंपरी-चिंचवडला 15 जानेवारीला सकाळी साडेअकरा वाजता मुख्य सभामंडपात पोहोचले.
माझ्याकडे निमंत्रण पत्रिका वगैरे नसल्यामुळे खरं तर आत मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु माझे भाग्य चांगलं की तिथून माझा मित्र नंदेश उमप बाहेर पडत होता ,त्याच्या ओळखीमुळे मला मुख्य मंडपात प्रवेश मिळाला आणि अगदी पहिल्या रांगेतून भव्य ,दिव्य उद्घाटनाचा सोहळा याची देही याची डोळा पाहिला आणि मी अतिशय भारावून गेले. असं हे संमेलन न भूतो न भविष्यती होत आहे याची खात्री झाली.. त्यामुळे सहाजिकच संमेलनात थांबण्यासाठी जरी मी आले नव्हते तरीसुद्धा संमेलनातून पाय निघत नव्हता.
परंतु जेव्हा मी आयोजकांकडे चौकशी केली आजूबाजूला माझी कुठे निवासाची व्यवस्था होईल का? परंतु सगळीच निवासस्थाने भरगच्च होऊन गेल्यामुळे माझी कुठेही निवासाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली नाही. मी निराश झाले आणि संध्याकाळी परत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी कविसंमेलन संपून मी आणि माझे स्नेही चंद्रकांत गोखले मुख्य सभामंडपातून बाहेर पडत होतो.
आणि तेवढ्यात. ..मला समोरून स्वागताध्यक्ष डॉक्टर पी. डी. पाटील सर येताना दिसले. आणि मी सरांना ओळख नसतानाही जाऊन डायरेक्ट म्हटलं की ,”सर माझी राहण्याची व्यवस्था काही होत नाहीये , मला संमेलनास उपस्थित राहण्याची इच्छा आहे. “. आणि क्षणार्धात त्यांनी त्यांच्या सहाय्यकास सांगितले मॅडमची देखील चांगल्या ठिकाणी व्यवस्था करा. अर्ध्या तासात मला एका तारंकीत हॉटेलचा पत्ता दिला गेला की जिथे मराठी साहित्य व चित्रपट सृष्टीतील दिग्गज उतरले होते. नि मला संमेलनाच्या ठिकाणाहून तिथे पोहोचवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शर्मा सर देखील आले.
आणि पुढचे चार दिवस मी संमेलनाचा पुरेपूर आनंद लुटला. स्वागताध्यक्ष डॉ पी डी सरांची अगत्यशीलता , प्रत्येकाला काय हवं काय नको यासंबंधी विचारपूस करणं हे एक सुसंस्कृत व्यक्ती च करू शकते. आणि एका मोठ्या शैक्षणिक संस्थेचे कुलगुरू असतानाही कोणताही अभिमान न बाळगणारे असं हे समृद्ध, सुशील ,प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यामुळे या संमेलनाला केवळ आर्थिक वैभवशाली झालर होती , असं नव्हे तर साहित्य , संस्कृती , ज्ञान, समृद्धता यांचं कोंदण या संमेलनाला लाभलं. मी तर म्हणेन की या साहित्य संमेलनाने साहित्य विश्वात इतिहास रचला. या साहित्य संमेलनाची मी एक साक्षीदार झाल्याबद्दल मला मनापासून आनंद आहे.
(आपणही आपला अनुभव आम्हाला 9422757523 या नंबरवर व्हॉटस्ॅप करु शकता)