मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटीच्या संपाबाबत आज मोठा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. थोड्याच वेळात यासंदर्भामध्ये बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत संप मागे घेण्याबाबत अंतिम तोडगा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. वेळेवर पगार न होणे, अत्यंत पगार कमी असणे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. ऐन दिवाळीच्या सणातच कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. आज दोन महिन्यापेक्षा अधिक काळ झाला तरी तोडगा निघालेला नसून कर्मचारी संपावर ठाम आहेत. हा प्रश्न मुंबई हायकोर्टात गेला असला तरी तेथेही अद्याप अंतिम निकाल लागलेला नाही. कर्मचारी कामावर येत नसल्याने महामंडळाने खासगी कंत्राटी कर्मचारी नेमण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे तिढा वाढतच आहे.
अखेर एसटी कृती समितीची आज थोड्याच वेळात बैठक होत आहे. शरद पवार यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, परिवहन सचिव हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निर्णायक चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.