विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नीती आयोग आणि पिरामल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित हम, सुरक्षित तुम अभियानाचा शुभारंभ काल झाला. या अभियानांतर्गत ११२ आकांक्षित जिल्ह्यांमध्ये कोव्हिड१९ च्या लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना घरपोच वैद्यकीय मदत पुरवण्यात येणार आहे. या अभियानातून २० लाख नागरिकांना सहाय्य मिळणार आहे.
यात स्थानिक नेते, नागरी संस्था आणि स्वयंसेवकांच्या मदतीने जिल्हा प्रशासन कार्य करणार आहे. या अभियानाचे प्रमुख त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने त्या भागातल्या रुग्णांच्या मदतीसाठी एक लाखाहून जास्त स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं जाईल. या अभियानाचं उद्घाटन करताना नीती आयोगाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की या अभियानामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल आणि लोकांमध्ये पसरलेली कोरोनाची भीतीही कमी होण्यास मदत होईल.