इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डांगसौंदाणे (ता. बागलाण) मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान २०२४-२५ अंतर्गत बागलाण तालुक्यातील जनता विद्यालय, डांगसौंदाणे या ग्रामीण शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरावर तिसरा क्रमांक पटकावला असून, रु. १ लाखाचे रोख पारितोषिक मिळवले आहे.
या अभियानांतर्गत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकवर्गाने एकजुटीने मेहनत घेतली. शाळेच्या स्वच्छता मोहिमा, सौंदर्यीकरण, भित्तिचित्रांची रंगसजावट, शैक्षणिक उपक्रमांची सृजनशीलता आदी बाबींमध्ये भरीव कामगिरी केल्यामुळे हे यश शाळेच्या झोळीत पडले.
या यशामागे पंचायत समिती बागलाणचे प्रभावी मार्गदर्शन, तसेच गटशिक्षणाधिकारी श्रीमती चित्रा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी महाले केंद्रप्रमुख बधान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वेळोवेळी दिलेल्या सूचनांनी शाळेच्या कार्याला दिशा मिळाली.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर, उपाध्यक्षा सुशीला आहेर, सचिव डॉ. मालती आहेर, प्रशासक बी. के. रौंदळ, स्कूल कमिटीचे चेअरमन संजय सोनवणे, सदस्य पंढरीनाथ बोरसे, पंढरीनाथ सोनवणे, संदीप सोनवणे, रवींद्र सोनवणे आदी मान्यवरांनी शाळेचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील शाळाही स्वच्छता, शिस्त, सौंदर्यीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांच्या माध्यमातून उच्च शैक्षणिक मानक गाठू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.