भोपाळ (मध्य प्रदेश) – वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी सामाजिक भान जपत समाजासाठी काही ना काही करत असतात. गरजू मुलांसाठी शिक्षणाची सोय असो अथवा राहण्यासाठी निवारा असो. फूल ना फुलाची पाकळी या म्हणीप्रमाणे ते योगदान देत असतात. योगदान देणार्या सेलिब्रिटींच्या नावात कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचा देवता माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सचिन तेंडुलकर यांचे फाउंडेशन सामाजिक कार्यातील या मोठ्या हवनात समिधा वाहात आहे.
याच पार्श्वभूमीवर फाउंडेशनच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी मंगळवारी मध्यप्रदेशमधील दुर्गम भागातील सेवानिया या गावाचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी मुलांसाठी राबविल्या जाणार्या विविध सामाजिक कल्याण योजनांचा आढावा घेतला. विविध सामाजिक कल्याण योजनांशी सचिन तेंडुलकर निगडित आहेत. यामध्ये त्यांचे दिवंगत वडील रमेश तेंडुलकर यांच्या आठवणीत सुरू करण्यात आलेल्या शाळेचाही समावेश आहे.
सचिन तेंडुलरकर यांचे फाउंडेशन विविध योजनांशी जोडले गेले आहे. त्यामध्ये मुलांना पोषक अन्न उपलब्ध करून देणे आणि सेवा कुटिरच्या माध्यमातून खेळ खेळण्याची संधी निर्माण करून देणे अशा सेवांचा समावेश आहे. तेंडुलकर यांच्या फाउंडेशनच्या मदतीने चालणारी एक सेवाभावी संस्था आदिवासी मुलांसाठी सेवा कुटिर योजना चालविते.
आदिवासी मुलांसाठी शाळेची निर्मिती
या भेटीदरम्यान सचिन तेंडुलकर यांनी युवा शिक्षकांशी संवाद साधला. तसेच मुलांसाठी पोषक अन्न शिजवल्या जाणार्या स्वयंपाकघराची पाहणी केली. यादरम्यान ते संदलपूर येथे गेले. तेथे तेंडुलकर फाउंडेशनकडून बांधल्या जाणार्या शाळेचा आढावाही घेतला. राहण्याची व्यवस्था असलेल्या या शाळेत स्थानिक आदिवासी मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. आगामी दहा वर्षात येथे अडीच हजार मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.
https://twitter.com/sachin_rt/status/1460602197117313026