न्यूयॉर्क – अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मंगळ ग्रहावरून एकत्र केलेली धूळ आणि माती पृथ्वीवर आणण्याची योजना आखत आहे. नासाच्या या योजनेची अंमलबजावणी झाल्यास ती जगातील सर्वात महागडी वस्तू ठरेल. मानव जातीसाठी हा सर्वात महाग पदार्थ असणार आहे. नासाचे हे सर्वाधिक महाग अभियान आहे. या अभियानात जवळपास ९ अब्ज डॉलर खर्च होणार आहे.
मंगळावरून एक किलो माती आणणार
नासा आपल्या तीन अंतराळ अभियानादरम्यान मंगळावर प्राचीन जीवसृष्टी होती की नाही हे जाणून घेण्यासाठी २ पाउंड (जवळपास एक किलो) मंगळावरील माती पृथ्वीवर आणणार आहे. दोन पाउंड माती आणण्यासाठी नासा सोन्याच्या किमतीच्या दोन लाख पटीहून अधिक पैसा खर्च करणार आहे. लाल ग्रहावर संशोधन करण्याचा उद्देश असल्याचे नासाचे म्हणणे आहे. या मातीला पृथ्वीवर आणल्यानंतर त्यावर अनेक संशोधन केले जातील. मंगळावर पाठविलेल्या रोव्हरद्वारे तेथील माहिती एकत्रित करण्यात येत आहे. परंतु नासा प्रथमच मंगळावरून माती आणत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये मोठा उत्साह आहे.
काय आहे नासाचे अभियान
दोन पाउंड माती आणण्यासाठी नासातर्फे तीन अभियानांद्वारे मंगळावर यान पाठविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मंगळावरील धूळ एकत्र करून त्यांची तपासणी करणे हे नासाचे पहिले अभियान असेल. सर्व नमुन्यांना एकत्र करून त्यांना मंगळ ग्रहाच्या कक्षेत लॉन्च करण्यासाठी लॉन्चरमध्ये पॅक करणे हे दुसरे अभियान असेल. तसेच मंगळावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणे हे तिसरे अभियान असेल. पहिले अभियान परसिवरेन्स रोव्हरच्या रुपात जुलै २०२० मध्ये लॉन्च करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२१ रोजी रोव्हर मंगळावर लँड झाले होते. मंगळावरील जेजेरो क्रेटरजवळ प्राचीन जीवसृष्टीच्या संकेतांना शोधण्याचे काम रोव्हर करत आहे. जेजेरो क्रेटर प्राचीन तळ्याचा भाग होता. अब्जावधी वर्षांपूर्वी पाण्याचे स्त्रोत नष्ट झाले होते.