इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका या टॉप ५ मध्ये असतात. यातील कथानक आणि पात्र यामुळे घराघरात या मालिका हमखास पाहिल्या जातात. यातील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सर्वांची लाडकी आहे. अल्पवधीत ही मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेची लोकप्रियता इतकी वाढली की, या मालिकेतील पात्र अनिरुध्द देशमुख म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांना प्रेक्षक भेटल्यावर ‘अरे त्या अरुंधतीशी प्रेमाने वाग’ असा प्रेमळ सल्ला मिळाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला होता. या मालिकेत अनेक ट्विस्ट आजवर दिसले आहेत. आता पुन्हा एकदा मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.
अरुंधती आशुतोषला तिच्या मनातली गोष्ट सांगणार एवढ्यात तिला अभिषेक एका मुलीसोबत दिसला आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामुळे आता अभिषेकचे विवाहबाह्य संबंध अरुंधतीसमोर उघड होणार आहेत, असं एकंदरीत दिसतं आहे. अरुंधतीसाठी हा मोठा धक्का असून ती हा धक्का कसा पचवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'पुन्हा अशा नात्यात अडकू नकोस, ज्यातून बाहेर पडण्याशिवाय पर्यायच उरणार नाही तुला'…
'आई कुठे काय करते !'
सोम-शनि संध्या. ७:३० वा. Star प्रवाहवर.#AaiKutheKayKarte #StarPravah pic.twitter.com/dOoGoF2ZBY— Star Pravah (@StarPravah) December 9, 2022
‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अरुंधतीने स्वतःची नवी वाट निवडली आहे. तर देशमुखांच्या कुटुंबात अनिरुद्ध आता संजनापासून देखील वेगळा होत आहे. दुसऱ्या बाजूला अप्पांच्या आजारामुळे घरचे सगळे काळजीत आहेत. अनघा आणि अभिषेक आता आईबाबा होणार आहेत. एक मोठा संघर्ष करत अनघाच वैवाहिक आयुष्य आता कुठे मार्गी लागलं असून ती आईपणाच्या स्वप्नात रंगली आहे. मात्र तिच्या स्वप्नांना उधळून लावणारं वादळ लवकरच तिच्या आयुष्यात येऊ घातलं आहे. या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोनुसार, अरुंधती आणि आशुतोष लग्नाबद्दल बोलण्यासाठी एका कॅफेमध्ये बसल्याचे दिसत आहे. यावेळी आशुतोष काही बोलणार इतक्यात तिथे अभिषेक एका मुलीबरोबर येतो. त्यावेळी अभिषेक हा त्या मुलीच्या हातात हात घालून कॅफेमध्ये येताना अरुंधती पाहते. अभिषेक त्या मुलीच्या हातावर किस करतो. हे सर्व अरुंधती पाहते आणि तिला जबरदस्त धक्का बसतो.
अरुंधती आशुतोषला सांगेल का तिचा निर्णय..?
'आई कुठे काय करते !'
बुधवार ७ डिसेंबर संध्या. ७:३० वा. Star प्रवाहवर.#AaiKutheKayKarte #StarPravah pic.twitter.com/j8xyZC3iJO— Star Pravah (@StarPravah) December 6, 2022
अभिषेकचे विवाहबाह्य संबंध आहेत, हे अरुंधतीसमोर उघड होणार आहेत. अभिषेक त्या मुलीसाठी अनघाची फसवणूक करत आहे. देशमुखांच्या घरात अजून एक अनिरुद्ध तयार झाल्याचे संजना वारंवार अनघा आणि घरच्यांच्या लक्षात आणून देत असते. मात्र तिच्या या संशयावर कुणी विश्वास ठेवत नाही. पण अभिषेक शेवटी अनिरुध्दच्याच मार्गाने जाताना दाखवण्यात येणार आहे. आता अभिषेकला दुसऱ्या मुलीसोबत पाहून अरुंधती काय निर्णय घेणार? ती घरी जाऊन सगळं सांगणार की अभिषेकला समजावण्याचा प्रयत्न करणार? अनघा गरोदर असताना अभिषेक तिची फसवणूक करतोय हे अरुंधतीला सहन होणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नावर याचा परिणाम होणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. मालिकेतील ट्विस्टमुळे यातील प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवण्यात मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते यशस्वी ठरल्याची चित्र आहे.
Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte New Twist