नाशिक – कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पुजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी लितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.
यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गिता,
ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली.
ही दिंडी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघून नागरिकांना दिंडीत सहभागी होणे सोयीचे व्हावे, यासाठी टिळकपथ, पोलिस ग्राऊंड, सीबीएस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार, नेहरू उद्यान यामार्गाने सार्वजनिक वाचनालय येथे येवून त्यानंतर बसमधून संमेलन स्थळाकडे ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली आहे.